जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवुन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला नारायणगाव पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ता:-२३ रात्री अटक केली.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.याप्रकरणी अनिल सुनील जाधव वय २०,रा:- ठाकरवस्ती,वारुळवडी,ता:- जुन्नर) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार म्हणाले बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी येथील ठाकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमरेला पिस्तूल असलेला तरुण हातात कोयता घेऊन हातवारे करून धाक दाखवुन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नारायणगाव पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन तरुणाला ताब्यात घेत.त्याच्या ताब्यातील पिस्तूल व कोयता जप्त केला.तपासणी केली असता पिस्तूल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सोशल मीडियावर कोयता गँगचे व्हिडिओ पाहून दहशत निर्माण करण्यासाठी या तरुणांनी हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उप विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,फौजदार विनोद धुर्वे,गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार दीपक साबळे,संदिप वारे,अक्षय नवले,मंगेश लोखंडे,शैलेश वाघमारे,दत्ता ढेंबरे या संयुक्त पथकाने केली.