जुन्नर प्रतिनिधी :- रविंद्र भोर
उदापुर ता:-जुन्नर येथील सरस्वती विद्यालयात दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी आजी-आजोबा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबा आणि पालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून जुन्नर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यात सतत सहकार्य करणारे डॉ.सुनिल शेवाळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
यावेळी विद्यालयातील इन्ट्रॅक्ट रोटरी क्लबची अध्यक्षा ऋतुजा भोर हिने डॉ.सुनिल शेवाळे यांचा शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सत्कार केला यावेळी मुख्याध्यापक शिवाजी अस्वार, उदापुर गावच्या माजी उपसरपंच डॉ.पुष्पलता शिंदे,सर्व शिक्षक,शिक्षिका, सर्व विद्यार्थी,कर्मचारी उपस्थित होते.विदयार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबा यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे विचार मांडले.सर्व आजी-आजोबांचे शाळेमध्ये ढोल ताशाच्या गजरात प्रसन्न मिरवणूक काढण्यात आली व त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे औक्षण करून पाद्यपूजा केली. यामुळे सर्व उपस्थित आजी -आजोबा भारावून गेले.
उपस्थित पालकांनी अनेक मेळाव्यात आपले विचार मांडले.अनेक पालकांनी शाळेच्या गुणवत्ते विषयी व प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.काहींनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी काही सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांना नियमित गृहपाठ देण्याची अपेक्षा व्यक्त केली.तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी शाळेत करून घेतली जाते व त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे सर्वांनी आश्वासन दिले.त्याचप्रमाणे शाळेच्या भौतिक विकासाला सर्वोतोपरी हातभार लावण्याचे सर्वांनी मान्य केले.
यावेळी आजी आजोबांना मार्गदर्शन करताना डॉ सुनिल शेवाळे यांनी सरस्वती विद्यालयाचे अभिनंदन केले कारण सध्या आजी,-आजोबा व नात-नातू यांच्यातील नात्यात फार मोठा बदल झालेला असून मोबाईलच्या अतिवापराने मुले एकलकोंडी बनले आहेत मात्र विद्यालयाने असे आजी-आजोबा सन्मान सोहळ्याचे कार्यक्रम आयोजित केल्याने त्यांच्या नात्यात गोडवा निर्माण होण्यास मदत होईल,सर्व आजी आजोबा यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक झोप घेऊन परिपूर्ण अभ्यास करावा असे सुचविले व शाळेच्या गुणवत्ता पाहून गौरव केला.तसेच आजी- आजोबांचे कुटुंब व्यवस्थेतील महत्त्व समजावून सांगितले.