जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
(विद्यापीठ देणार चार लाख रुपये शिष्यवृत्ती)
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे या औषधनिर्माणशास्त्र पदवी महाविद्यालयातील अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या गौरवी पाचरणे हीने स्ट्रॅथक्लाइड,ग्लासगो,स्कॉटलंड,युनायटेड किंगडम या विद्यापीठात एम एस्सी (ॲडव्हान्सड फार्माकोलॉजी) या अभ्यासक्रमासाठी नुकताच प्रवेश घेतला आहे. सदर विद्यापीठाकडून या विद्यार्थिनीला चार लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की यांनी दिली.
समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी पदवी व तत्सम अभ्यासक्रम या संकुलात पूर्ण करून पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी जगातील विविध देशांमधील नामवंत विद्यापीठामध्ये गुणवत्तेच्या जोरावर सरकारी शिष्यवृत्ती मिळवून घेत आहेत ही अभिमानाची व गौरवाची बाब आहे.त्यांच्या या यशामध्ये विद्यार्थ्यांचे प्रयत्न,मेहनत,कष्ट त्याचबरोबर मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांची मोलाची साथ व प्रयत्न या गोष्टी महत्वाच्या ठरतात.आज समर्थ शैक्षणिक संकुलात विविध अभ्यासक्रम पूर्ण करून जगातील नामवंत कंपन्यामध्ये संकुलातील विद्यार्थी कार्यरत आहेत.अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील हे विद्यार्थी जगामध्ये आपल्या कर्तृत्वाचा,ज्ञानाचा ठसा उमटवताना आपण पाहतो तेव्हा त्याचा आनंद व अभिमान वाटतो.
संस्थेच्या यशस्वी वाटचालीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या उच्च शिक्षणाच्या संधी ही बाब संस्थेच्या दृष्टीने भूषणावह असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.गौरवी पाचारणे हिने मिळवलेल्या या यशाबद्दल तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की यांनी अभिनंदन केले व गौरवीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.