शिरूर प्रतिनिधी
चासकमान डाव्या कालव्यावरील डी वाय १३ मायनर ७ च्या वरील निमगाव म्हाळुंगी हद्दीतील आपण बांधकाम केलेला सिमेंटचा पूल कुठलीही व कोणाचीही परवानगी न घेता सदर पूल तोडून तसेच सदर चारी बुजवून त्यामध्ये पाण्याच्या नळ्या टाकून अतिक्रमण करणा-यावर कारवाई करावी अशी मागणी शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने चासकमान कालवा उपविभाग शिक्रापूर सहाय्यक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सरपंच बापूसाहेब काळे यांनी चासकमान उपविभाग सहाय्यक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, निमगाव म्हाळुंगी येथील चासकमान डावा कालवा मधील डी वाय १३ मायनर ७ च्या वरील निमगाव म्हाळुंगी हद्दीतील आपण बांधकाम केलेला सिमेंटचा पूल कुठलीही व कोणाचीही परवानगी न घेता सदर पूल तोडून तसेच सदर चारी बुजवून त्यामध्ये पाण्याच्या नळ्या टाकून अतिक्रमण सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असता ग्रामस्थांनी सदर विषय सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांच्या निदर्शनास आणून दिला.सरपंच ग्रामस्थांसमवेत पाहणी करण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी ३० ते ३५ वर्षांपूर्वीचा सदर चारीवरील पूल तोडलेला दिसला.सदर चारी बुजवून त्या चारीमध्ये पाण्याच्या नळ्या टाकून सदर चारी बुजवण्यात आली.
यावेळी सदर काम करीत असलेल्या व्यक्तीला सदर काम करण्यासाठी शासनाची परवानगी घेण्यात आली आहे का असे पत्र दाखवा असे सरपंचांनी विचारले असता सदर व्यक्तीने असे कुठल्याही प्रकारचे पत्र नाही असे सांगितले.त्यामुळे सदर काम बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आल्याने व यामुळे निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांची शेताच्या व पिण्याच्या पाण्याची गैरसोय होवून खूप मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे सदर व्यक्तीवर लवकरच लवकर कारवाई करून निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.