शुभम वाकचौरे
शिरूर मध्ये रविवारी (ता.१४) मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून दोन ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्या. त्याबाबत स्थानिक गुन्हेअन्वेशनसह शिरूर पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेत दहशत निर्माण करण्यासाठी विनापरवाना पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील टोळक्याची धरपकड सुरू केली आहे.
आशितोष काळे ( वय २४, रा. साईनगर शिरूर), अरबाज शेख (वय २३, रा. सय्यद बाबा नगर, शिरूर) व प्रकाश गायकवाड (वय २० रा. जाधव मळा, रामलिंग रोड, शिरूर) यांना गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आले असून, पप्पू राजापुरे, प्रवीण तुबाकी, अरबाज खान, शुभम गाढवे व कुणाल मस्के यांच्या विरोधात बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी व विनापरवाना शस्त्राच्या आधारे गोळीबार करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आदित्य भोईनल्लु (वय २१, रा. कामाठीपुरा, शिरूर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा भाऊ वैभव याच्यासोबत असलेल्या जुन्या वादाच्या रागातून अरबाज शेख याने पुणे- नगर रस्त्यावरील आर. के. हॉटेलजवळ आदित्यला अडवून त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र, त्याला गोळी लागली नाही. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर आदित्य कामाठीपुरातील मुलांसह हनुमान मंदिराजवळील कट्ट्याजवळ थांबलेला असताना तेथे अरबाज शेख, आशितोष काळे, पप्पू राजापुरे, अरबाज खान, प्रवीण तुबाकी, प्रकाश गायकवाड, शुभम गाढवे व कुणाल म्हस्के हे दुचाकींवरून आले. त्यांना पाहून भोईनल्लु व त्याचे मित्र पळून जात असताना आशितोष काळे याने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला. या प्रकारानंतर आदित्य भोईनल्लु याने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी सोमवारी त्यातील तिघांना अटक केली आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घटटे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, संदीप यादव, पोलीस उपनिक्षक अभिजीत पवार, सुनिल उगले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, गणेश देशमाने, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, बबलु नागरगोजे, राजु मोमीन, पोलिस नाईक प्रताप टेंगले, पोलिस अंमलदार विनोद काळे, सचिन भोई, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, गणेश पालवे, अक्षय कळमकर या टिमने केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करीत आहेत.