वाहतुकीच्या नियमांचे पालन करा आणि रस्ता अपघात टाळा:-आरटीओ तानाजी धुमाळ
जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतेच रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्यामार्फत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहक निरीक्षक तानाजी धुमाळ,सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक तेजश्री कुलकर्णी,आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमाकांत नलावडे,संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके तसेच सर्व विभागाचे प्राचार्य,विभाग प्रमुख,शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथील मोटार वाहक निरीक्षक (आरटीओ) तानाजी धुमाळ म्हणाले की रस्त्यावर बरेचसे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होत असतात.अपघातात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची आकडेवारी पाहता तरुण वयोगटातील बहुसंख्य असल्याचे दिसून येते.युवा वर्गात रस्ता सुरक्षा विषयाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त जनजागृती होणे आवश्यक आहे.म्हणूनच महामार्ग पोलिसांनी महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती चे काम हाती घेतलेले आहे.आजचा विद्यार्थी उद्याचा चालक असल्याने त्यांच्यात जागृती झाल्यास भविष्यात अपघातांना आळा बसू शकतो.
शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत असताना एक जबाबदार नागरिक बनावे.रस्ता सुरक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी ट्रिपल सीट गाडी चालवणे,कट मारणे,वेग मर्यादा वाढवणे, वळणावर वेग वाढवणे,चार चाकी मध्ये सीट बेल्ट न लावणे यांसारख्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत.बहुतांशी अपघात हे वेळेवर उपचार न मिळाल्याने होत असतात.म्हणूनच अपघात स्थळी जखमींना तात्काळ मदत ही केली गेली पाहिजे.दुचाकी चालवताना हेल्मेट चा वापर केला पाहिजे.मद्य प्राशन करून वाहने चालवू नयेत.एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि रस्ता अपघात टाळा असा संदेश आर टी ओ तानाजी धुमाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय कंधारे यांनी तर आभार समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले यांनी मानले.