जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
“विज्ञानाचे आकलन चांगल्याप्रकारे होण्यासाठी विद्यार्थ्यांना विचारप्रवण व कृतिप्रवण करणे आवश्यक आहे.असे मत राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित झालेले विज्ञान प्रसारक व शैक्षणिक सल्लागार हेमंत लागवणकर यांनी कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले.
खोडद ता.जुन्नर येथील जीएमआरटी प्रकल्पात रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री लंडन प्रस्तुत विज्ञान शिक्षकांसाठी शुक्रवारी व शनिवारी ता. १,२ दोन दिवसीय कार्यशाळा झाली.या वेळी मार्गदर्शन करताना लागवणकर बोलत होते.ही कार्यशाळा जीएमआरटी प्रकल्प,खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र,जुन्नर तालुका मुख्याध्यापक व विज्ञान-गणित अध्यापक संघाच्या वतीने आयोजित केली होती.त्यात तालुक्यातील चाळीस शिक्षकांचा सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांनी जीएमआरटीच्या विज्ञान प्रसाराची भूमिका विशद केली.राज्य अध्यापक संघाचे उपाध्यक्ष महेंद्र गणपुले व खोडद ग्रामीण विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.दिव्या ओबेरॉय तसेच संचालिका जयश्री ओबेरॉय यांनी शिक्षकांशी संवाद साधलाया वेळी वैज्ञानिक प्रयोग- प्रात्यक्षिकांबरोबरच कृतियुक्त पद्धतीने वैज्ञानिक संकल्पना शिकविण्याची अनेक तंत्र शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतीतून समजून घेतली. रसायनशास्त्रातील प्रयोग कमीत कमी साहित्य-पदार्थ वापरून तसेच अत्यंत सोप्या पद्धतीने कसे करता येतात याचा वस्तुपाठ शिक्षकांना मिळाला.
विद्यार्थी स्वतःची विज्ञान पेटी कशी तयार करु शकतील याबद्दल माहिती दिली.जिएमआरटीतील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ सुधीर फाकटकर यांनीप्रारूपाच्या (मॉडेल) माध्यमातून सूर्यमाला सोप्या पद्धतीने समजावून सांगत त्याचे उपयोग स्पष्ट केले. याप्रसंगी जालिंदर डोंगरे यांनी भावी समाज घडविण्यामागील शिक्षकांच्या भूमिकेची गरज अधोरेखित केली. खोडद ग्रामीण विज्ञान केंद्राच्या समन्वयक सुरेखा फाकटकर यांनी आभार मानले.