प्रतिनिधी: एकनाथ थोरात

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता .शिरूर ) येथील हाडाचे शेतकरी विश्वनाथ मारुती गवारी उर्फ आप्पा यांचे नुकतेच वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले . मृत्यू हे माणसाच्या जीवनातील अंतिम सत्य असलं तरी त्यावर विजय मिळवता आला पाहिजे .जीवनभर केलेले चांगले कर्म , कृतार्थ जीवन आणि आयुष्याच्या उत्तरार्धात होणारा सुखमय प्रवास ,यामुळे मृत्यूवर विजय मिळवता येतो . आणि असा विजय आप्पांनी मिळविलेला आहे . ‘असा जन्म लाभावा देह चंदनाचा व्हावा , गंध गेला तरीही सुगंध दरवळतच राहावा । असे काहीसे आप्पांचे जीवन होते .

प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी ,ता .शिरूर ,जिल्हा पुणे येथील गवारी परिवार हे एक प्रथितयश कुटुंब ! कै . विश्वनाथ आप्पा , कै .ज्ञानोबा आणि पांडुरंग हे तीन भाऊ तर ह .भ.प . सोपानकाका ,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन तथा विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती अण्णा गवारी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजी आप्पा गवारी , कै .काळूराम गवारे हे त्याचे चुलत बंधू होत .मोठी शेती , बैल बारदाना आणि शेकडोंच्या संख्येने धान्याची पोती पिकणारा हा शेती निष्ठ परिवार ! आजही त्यांची फार मोठी बागायत शेती आहे .नि :स्वार्थीपणे समाजासाठी .काम करण्याची तळमळ ,कष्ट , जिद्द ,चिकाटी , प्रामाणिकपणा आणि एकमेकांबद्दल प्रेम असणारा सर्व परिवार आजही एक दिलाने आणि एक विचाराने आपले जीवन व्यतित करत आहे . ना कोणता बडेजाव ना कोणता गर्व .या परिवारातील सर्वच भाऊ आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहे गेले अनेक वर्षांपासून गावच्या पटलावर महत्त्वाची भूमिका बजावत गावच्या रचनात्मक विकासामध्ये या कुटुंबाचे फार मोठे योगदान आहे . जिल्ह्याचे नेते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन श्री निवृत्तीआण्णा गवारी यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून श्री पांडुरंग विद्यालयाची स्थापना केली आणि गोरगरीबांच्या मुलासाठी परमार्थाच्या पंढरी बरोबर ‘ ज्ञानपंढरी ‘ चाही मार्ग दाखविला .या विद्यालयात शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थीआज उच्च पदावर विराजमान झालेले आहे .

विठ्ठलवाडी गावाला शिक्षणाचा मुलमंत्र देणारे कै गुरुवर्य भिमाशंकर पानसे गुरुजी व त्यांचे सर्व कुटुंब यांचा कै .आप्पांच्या कुटुंबाला अनेक वर्षांचा सहवास लाभला होता . त्यातुन गवारी परिवाराला शिक्षणाची नवी दृष्टी मिळाली होती . कै .आप्पांनीही शिक्षणाचे महत्त्व जाणले होते , नव्हे ते एक शिक्षण प्रेमी होते . त्यांनी आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षण दिले .आप्पांचे थोरले चिरंजीव श्री .विठ्ठलराव गवारे हे पांडुरंग विद्या मंदिर या विद्यालयात वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असून शिरूर तालुका माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत . शिक्षण खात्यातील प्रशासकीय व कार्यालयीन कामकाजाचे सखोल ज्ञान व अनुभव असल्याकारणाने जिल्हाभरातील अनेक अध्यक्ष , मुख्याध्यापक , शिक्षक ,लिपिक वर्ग त्यांच्याकडे सातत्याने मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतो .त्यांच्या थोरल्या सुनबाई सौ .सविता ताई या विठ्ठल शिक्षण प्रसार मंडळ प्रसारक मंडळाच्या संचालिका आहेत .दुसरे चिरंजीव लक्ष्मण गवारी हे एका नामांकित कंपनीमध्ये सेवा बजावत आहेत तर सौ .अश्विनीताई गवारी या गृहिणी आहेत , तिसरे चिरंजीव रामचंद्र व सुनबाई सौ .मंदाताई या शेती व्यवसाय सांभाळतात .कै . आप्पांच्या कन्या धामारी येथील डफळ परिवारात आहेत .कै .आप्पांचे नातू रोहन गवारे हे ग्रॅज्युएट असून जनता सहकारी बँकेतील शिरूर शाखेत कार्यरत आहेत . विवेक गवारे ‘ टाटा मोटार्स ‘ मध्ये उच्च पदावर काम करत आहेत तरप्रणव गवारी हे बी .ई . (इलेक्ट्रॉनिक्स ) आहेत तर कै . आप्पांच्या नाती , मेघा , प्रणाली व ऋतुजा उच्च शिक्षण घेत आहेत . असा हा उच्चशिक्षित आणि विनम्र असणारा एक आदर्श परिवार आहे . या सगळ्यांचा आधारवड मात्र कै आप्पा होते .आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व , आईकडे अश्रूंचे पाट असतात तर बापाकडे असतात संयमांचे घाट , आपल्या लेकरांच्या उदयाच्या जेवणाची चिंता करते आई असते आणि मुलांच्या आयुष्यभराच्या भाकरीची सोय करणारा बाप असतो . अशा वडिलांच्या सर्व भूमिका कै . आप्पांनी लिलया साकारल्या . शेती आणि मातीशी नाळ असणाऱ्या आप्पांचे जीवनच मोठे कष्टमय व आदर्श होते . सार्वजनिक क्षेत्रात आपले भाऊ , पुतणे , मुले चांगले काम करतात व नातवंडे उच्चशिक्षित आहेत याचा त्यांना फार अभिमान होता . अत्यंत साधेपणा असणारे आप्पा प्रसिद्धी , झगमगाट , सार्वजनिक जीवन यांच्यापासून ते दुरच राहिले . पत्नी मातोश्री आनंदीबाई व मुलांनी आप्पांची दिवस केलेली सेवा – सुश्रुषा नव्या पिढीला प्रेरणा देत राहील . अर्थात आप्पांनी दिलेली ही संस्काराची शिदोरी आहे . आयुष्यभर ‘ रान जीवाचे करून घाम पिकाला पाजला ‘बाप घामाच्या मोत्यांनी उभा सजला – धजला ।’स्वाभिमानी बाणा आणि कणखर कणा ‘ असलेल्या कष्टाळू , कृषिनिष्ठ शेतकरी कै विश्वनाथ आप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

-शब्दांकनश्री बाळासाहेब गायकवाड . (सहशिक्षक )श्री पांडुरंग विद्या मंदिर , विठ्ठलवाडी .

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button