जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

पुणे,ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमारेषांवर सह्याद्रीच्या पर्वतावर हरिश्चंद्रगड वसलेला आहे.या गडाला प्राचीन भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्व आहे.

हरिश्चंद्र गडाचा सबंध हा सत्वशील हरीचंद्रराजा, विश्वमित्र ऋषी,चांगदेव ऋषी,नाथ संप्रदाय परंपरा, यांच्याशी जोडलेला आहे.मोगलांच्या ताब्यात गेल्या नंतरही मोगलांना हे सुंदर मंदिर उध्वस्त करावे वाटले नाही आणि ज्या इंग्रजानी महाराष्ट्रातील बहुतांश गडकोट तोफांनी बेचिराख केले त्यांनाही या मंदिराने भुरळ घातली.त्यामुळे इंग्रजाकडूनही मंदिराचा विध्वंस झाला नाही. सह्याद्री डोंगर रांगेत असलेला हरिश्चंद्रगड पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र आहे.या गडावर अनेक प्रसिद्ध ठिकाणे असून ती बघण्यासाठी देश विदेशातून पर्यटक तसेच निसर्ग अभ्यासक व भाविक भक्तगण या ठिकाणी वर्षभर भेट देत असतात.

हरिश्चंद्रगडावर पर्यटकांना भूल घालणारी ठिकाणे म्हणजे कोकणकडा, तारामती शिखर,रोहिदास शिखर आणि हरिश्चंद्राचे देखणे पुरातन मंदिर व मंदिरापुढील भव्य पुष्करणी व आजूबाजूला असणाऱ्या कोरीव लेण्या त्याचप्रमाणे अतिप्राचीन असे पाण्यातील केदारेश्वराचे भव्य शिवलिंग.भारतीय संस्कृतीचा एवढा अनोखा ठेवा हरिश्चंद्रगडावर आजही आपणास बघायला मिळतो.याच गडावर आदिमानवाच्या काळातील वस्तूंचे काही अवशेष संशोधकांना सापडल्याने हे ठिकाण अति महत्त्वाचे ठरते त्या दृष्टीने हे ठिकाण जतन करणेही अगत्याचे ठरते.सध्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात असणारा हरिश्चंद्रगड पुरेशा देखभाली अभावी जीर्णावस्थेत आहे. या गडावरील ठिकाणांबद्दल अनेक आख्यायिका दंतकथा आपल्याला ऐकायला मिळतात गडाच्या परिसरातील करंजाळे गावचे ग्रामस्थ याबद्दल म्हणतात की,पूर्वीच्या काळी दुष्काळ पडला की गावातील लोक हंडे,कळशा घेऊन केदारेश्वराला अभिषेक करण्यासाठी गडावर जात.भजनाच्या सुरावटीत लोक केदारेश्वराचे शिवलिंग पाण्याने तळबंब करत.पाऊस पाडण्यासाठी देवाची प्रार्थना करत.त्यानंतर हरिश्चंद्रगडावरील पवित्र जलाने हंडे,कळशा भरून घेत आणि गडावरून मध्ये कुठेही न थांबता भजन गात गडावरून थेट करंजाळे गावात येत.गावातील मारुती मंदिरात त्या पवित्र जलाने देव कोंडविला जाई व वरुण राजाच्या आगमनाची प्रतीक्षा केली जाई विशेष म्हणजे वरुण देव भक्तांच्या हाकेला धावून यायचा.पावसाच्या सरींनी अवघा परिसर भिजवून टाकायचा.

राजा हरिश्चंद्राने आपले राज्य स्वप्नामध्ये विश्वमित्र ऋषींना दान केले होते तो शब्द पाळण्या साठी राजा हरिश्चंद्र ,तारामती ,आणि रोहिदास हे या ठिकाणी येऊन वास्तव्य करून राहिले होते. अशीही एक अख्यायिका येथे सांगितली जाते.या ठिकाणाचा उल्लेख अग्निपुराण आणि मत्स्यपुराणात सुद्धा आढळतो.या गडाला ४००० वर्षांची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.त्या दृष्टीनेही हरिश्चंद्रगड इतर सर्व गडांमध्ये महत्त्वाचा ठरतो.शिलाहार राजा झंज यांनी नद्यांच्या उगम स्थानाजवळ जी बारा शिवमंदिरे बांधली, त्यातील एक शिवमंदिर म्हणजे हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर.या ठिकाणाहून मंगळगंगा नदीचा उगम होतो.अतिशय सुंदर कोरीव काम असणारे येथील शिवालय ऊन, वारा,पाऊस झेलत इतिहासाची साक्ष देत उभे आहे. पण या शिवमंदिराची योग्य देखभाल व दुरुस्ती केली नाही तर हा अनमोल ठेवा ढासळून जाण्याचा धोका आहे. मंदिरासमोरील पुष्करणीतील गाळ व कचरा पाचनईच्या ग्रामस्थांनी आणि एका सेवाभावी पर्यटक संस्थेने स्वच्छ करून पुष्करनीचे जतन करण्याचा प्रयत्न केला होता. असे जतन आणि संवर्धन इतर ठिकाणीही व्हावे व हरिचंद्र गडावरील हा अनमोल ठेवा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित रहावा या उद्देशाने पाचनईचे ग्रामस्थ पुरातत्वीय खात्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीची अपेक्षा करत आहेत.हरिश्चंद्र गडावरील शिवमंदिरात असणारे शिवलिंग वेगळ्या प्रकारचे असल्याचे नजरेस येते.मंदिरात चौकोनी आकार असणारे एक शिवलिंग मुख्य शिवलिंगाशेजारी दिसून येते. तसेच या शिवमंदिराच्या मागे असणाऱ्या एका गुहेत चौथऱ्याखालील खोलीमध्ये चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्ष तप केले होते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.

मंदिराच्या खालच्या बाजूला मंळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेले की केदारेश्वराची गुहा लागते. हरिचंद्र गडावरील सर्वात प्रसिद्ध असे हे ठिकाण आज मात्र शेवटच्या घटका मोजत असल्याप्रमाणे झिजत चालले आहे.या केदारेश्वराच्या गुहेत एक मीटर उंच आणि दोन मीटर लांब असे शिवलिंग आहे या शिवलिंगाभोवती कमरे इतके पाणी कायम असते. आणि ते पाणी बर्फासारखे थंड असते.ही गुहा चार खांबांवर तोललेली होती पण सध्या मात्र या ठिकाणी एकच खांब उभा असलेला दिसून येतो.इतर तीन खांब मात्र कोसळलेले आहेत.आतील शिवलिंगालाही तडा गेलेला असून ही प्रसिद्ध गुहा,येथील खांब,भव्य शिवलिंग जर वेळीच लक्ष दिले नाही तर कायमचे नष्ट होण्याचा धोका आहे.

येथील खांबाबद्दलसुद्धा लोकांची एक श्रद्धा आहे.ते चार खांब म्हणजे चार युगांचे प्रतीक आहेत सत्ययुग,त्रेतायुग,द्वापारयुग आणि कलियुग अशा चार युगांचे चार खांब या गुहेला तोलून धरत होते.पण जसजशी युगे सरली; तसतसे यातील खांब कोसळत गेले.सत्ययुगाचा खांब,त्रेता युगाचा खांब, द्वापार युगाचा खांब कोसळलेला आहे. आणि आता कलियुगाचा खांबही कसाबसा गुहेला आधार देत उभा आहे.तो जर कोसळला तर कली युगाबरोबर हे जग नष्ट होईल अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.आणि म्हणूनच येथील केदारेश्वराची गुहा त्यातील शिवलिंग आणि गुहेला तोलून धरणारे खांब यांची दुरुस्ती आणि देखभाल झाली पाहिजे.यासाठी पाचनईचे ग्रामस्थ त्याचप्रमाणे इतिहासप्रेमी पुरातत्त्व खात्याला मदतीची साद घालत आहेत.

येथील ऐतिहासिक, पौराणिक वास्तूंचे जतन एकतर पुरातत्त्व खात्याने करावे किंवा इतर खाजगी संस्थांना हे संवर्धन आणि जतन करण्याचे काम करण्यासाठी परवानगी द्यावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.अन्यथा आम्हाला ही आमची संस्कृती वाचवायला रस्त्यावर यावं लागेल,यावेळी संभाजीनगरयेथील पुरातत्व खात्याचे कार्यालयात जाऊन या जीर्णोद्धार बाबत लेखी निवेदन दिले यापूर्वी अनेक वेळा अशी निवेदन दिलेले आहेत मात्र पुरातत्व खाते उदासीन दिसून आले आहे. यावेळी जर पुरातत्व खात्याने याबाबत दुर्लक्षित केले तर पुढील परिणामांना हे खातेच जबाबदार राहील असे लोकनियुक्त आदर्श सरपंच पाचनई भास्करराव बादड,श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठान चे अध्यक्ष:-डॉ.गौरव पोपट घोडे, उपसरपंच पोपट गावंडे, ग्रामपंचायत खुबी:-माजी सरपंच उषा सुपे,गोरख भारमल,किरण सुभाष भारमल सदस्य,दत्ता बाळू भारमल सदस्य,सखाराम बुधा भारमल,संतोष भारमल,बाळू गावंडे,बुधा गावंडे संजय भारमल,सुरेश भारमल, बजरंग भारमल,रोहित बादड, भास्कर भारमल,भाऊ भारमल,तुकाराम घोगरे,प्रकाश सावळे,विनायक वाडेकर समाज सेवक,नानासाहेब बोऱ्हाडे (ओझर संगमनेर) देवा उंडे ,उमेश उंडे (गाईड)आणि सुभाष जगताप (अध्यक्ष टपरी चालक मालक असोसिएशनच संघटना करंजाळे माळशेज घाट रजि अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लेखन:-सुभाष जगतापअध्यक्ष:-टपरी चालक मालक असोसिएशन संघटनामाळशेज घाट-करांजळे र

जि.संकलन:-रविंद्र भोरउपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,पुणे जिल्हा.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button