जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जगात व भारत देशाच्या पाठीवर केवळ सह्याद्रीच्या डोंगररांगेत आढळून येणाऱ्या (फ्रेरिया इंडिका)"शिवसुमन"वनस्पतीची फुले जुन्नर तालुक्यातील प्रसन्नगड म्हणजेच चावंड किल्ल्यावर उमलताना आढळून आल्याची माहिती माजी सैनिक तथा वनरक्षक रमेश खरमाळे यांनी सांगितले.खरमाळे यांनी या अनोख्या व एकमेव असणाऱ्या फुलांची छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली आहेत.
वनरक्षक खरमाळे यांनी निसर्ग निरीक्षणातून नव्याने किल्ले चावंडवर अनेक ठिकाणी असलेल्या या वनस्पतीची नोंद घेण्यात यश मिळवले आहे.चावंड किल्ल्यावरील या वनस्पतीच्या फुलांची अनेक छायाचित्रे टिपलेली असून संग्रही ठेवली आहे.आज शिवनेरी किल्ल्याच्या नंतर चावंड किल्ल्याचे नाव शिवसुमन आढळणाऱ्या यादीत समाविष्ट होणार आहे.
"डालझेल"या शास्त्रज्ञाने शिवनेरी किल्ल्यावर शिवसुमन या फुलांची पहिल्यांदा शास्त्रीय नोंद केली होती.ही वनस्पती जगात व भारतात केवळ महाराष्ट्रातच आढळते.विशेषतः सह्याद्रीच्या पर्वतरांगां मधील किल्ले शिवनेरी,रंधा धबधबा,वज्रगड,शिवथरघळ,महाबळेश्वर,त्रंबकेश्वर,अंजनेरी पुरंदर,वज्रगड मुळशी,अशा निवडक ठिकाणी तीव्र डोंगरउतार आणि कड्यावर ही वनस्पती आढळून येते. स्थानिक भाषेत काही ठिकाणी तिला 'शिंदळ माकुडी"या नावाने ओळखले जाते. पुणे जिल्ह्याचे निसर्ग प्रतीकात्मक मानचिन्ह म्हणूनही वनस्पतीचे फूल ज्ञात आहे. भविष्यात चावंड किल्ल्यावरील या वनस्पतीचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी निसर्गप्रेमीं व पर्यटकांनी घेणे खूप गरजेचे असल्याचे रमेश खरमाळे यांनी सांगितले.
"छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आणि ही वनस्पतीदेखील पहिल्यांदा याच गडावर आढळून आली असल्याने निसर्ग अभ्यासकांनी या वनस्पतीला 'शिवसुमन' असे नाव दिले आहे. या वनस्पतीच्या फुलाचा आकार सुदर्शन चक्राप्रमाणे आहे. रायगडावर शिवराज्याभिषेकदिनी या वनस्पतीचे नामकरण 'शिवसुमन' असे करण्यात आले".
(:-सचिन पुणेकर:-निसर्ग
अभ्यासक)