जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
वन्यजीव सप्ताहानिमित्त वनविभाग जुन्नरच्या वतीने वनपरीक्षेत्र जुन्नर,ओतुर, घोडेगाव,मंचर,खेड, चाकण,शिरूर येथील स्थानिक रेस्क्यु टीमच्या सदस्यांसाठी सर्प व सर्पदंश जनजागृती कार्यशाळा शिवराय संकुल सभागृहात सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
वन्यजीव सप्ताहाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते तुळशीच्या रोपाच्या पुजनाने व महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या दरम्यान मान्यवरांचा सन्मान सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे ,वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सदानंद राऊत उपस्थित होते.
शून्य सर्पदंश मोहीम हा प्रमुख पाहुणे डॉ.राऊत यांचा माहितीपट दाखविण्यात आला. विषारी व बिनविषारी सर्प ओळखणे,सर्पदंश झाल्यास दिसणारी लक्षणे,प्रथोमोपचार,उपचार,सर्पदंशाने होणारे दुष्परिणाम,प्रतिबंध,सर्पदंश झाल्यास काय करावे व काय करू नये याविषयी सविस्तर मार्गदर्शन पॉवरपॉईंट सादरीकरण डॉ.राऊत यांनी केले.सर्पदंशा पासून होणाऱ्या मृत्यूचे प्रसंगी प्रमाण कमी करण्या- साठी असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देत डॉ.राऊत यांनी रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना करण्याचे आवाहन डॉ राऊत यांनी यावेळी केले. डॉ.पल्लवी राऊत यांनी यावेळी सर्पदंश झाल्यास बँडेजचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिक दाखवून याबाबत मार्गदर्शन केले.
स्थानिक रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी यावेळी विविध प्रकारचे प्रश्न विचारत आपल्या शंका कुशंकांचे निरसन केले व डॉ.सदानंद राऊत यांना हॉस्पिटलमध्ये प्राथोमोपचार प्रात्यक्षिक दाखविण्याबाबत सेशन घेण्यात यावे याबाबत मागणी केली.अमित भिसे यांनी वन्यजीव सप्ताहात वन्यजीवांचे महत्व अधोरेखित करत सर्पदंशा बाबतीत जागरूक राहून प्रत्येक वनपरीक्षेत्रात याबाबत माहिती देण्यासाठी सुचना दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी प्रदीप चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर, महेंद्र ढोरे, बिबट निवारण केंद्र माणिकडोह, जुन्नर, ओतुर, घोडेगाव, मंचर, खेड, चाकण व शिरूर वनपरीक्षेत्रातील ७ रेस्क्यु टीमचे अनेक सदस्य, वनपरीक्षेत्र जुन्नरचे वनपाल व वनरक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले तर आभार महेंद्र ढोरे यांनी मानले.