जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
सध्याच्या आधुनिक युगात आई-वडिलांना नोकरी निमित्ताने बाहेरगावी कामानिमित्त जावे लागते. नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारी ही आजी-आजोबांवर असते म्हणून आपल्या आजी-आजोबां- प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील येणाऱ्या पहिल्या रविवारी आजी आजोबा दिन साजरा करण्यात यावा असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे.त्यानुसार बुधवार दिनांक १३सप्टेंबर रोजी चिल्हेवाडी शाळेमध्ये आजी आजोबांची शाळा भरली नातवंडांचे बोबडे बोल, नातवांच्या चित्रकलाकृती, नातवांची गाणी हे सर्व पाहून आजी-आजोबांना आपले बालपण आठवले .मोबाईलच्या युगात वावरणारी मुलं आजी आजोबां- कडे लक्ष देत नाही ही गोष्ट शहरी भागांमध्ये जरी पहावयास मिळत असली तरी ग्रामीण भागामध्ये मात्र आजीच्या बटव्यातील खूप सार्या गोष्टी मुलांना अनुभवास मिळाल्या.
आजी-आजोबांनी आपल्या बालपणाविषयी सांगताना सांगितलं,की आम्ही शिकलो नाही परंतु आज आमची नातवंड शिकतात यामध्ये फार मोठा आनंद आहे.आजीच्या डोळ्यातील भावनांचे अश्रू निश्चितपणे शिक्षणाचे समाधान देऊन गेले.सर्व आजी-आजोबांचे गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी स्वागत केले त्यांना प्रणाम केला.सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वात दे माझ्या सारख्या आजोबाला फक्त तुझा पाप्पा दे या कवी कुसुमाग्रज यांच्या काव्य पंक्ति आज अनुभवास आल्या.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिल्हेवाडी गावचे माजी सरपंच लक्ष्मण भोईर होते. त्यांनी आपल्या खूप साऱ्या आठवणी मुलांना सांगितल्या.हुतात्मा राजगुरू यांचा पोवाडा त्यांनी सादर केला.
याप्रसंगी निर्मला भोईर,लीलाबाई भोईर, रेश्माबाई भोईर,सरूबाई भोईर,येणूबाई भोईर, लक्ष्मीबाई भोईर,सीताबाई भोईर या आजीबाई उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक किसन दाभाडे सर यांनी केले,तर आभार उपशिक्षक प्रभाकर दिघे यांनी मानले.