प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियाना अंतर्गत ५०० विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल,धामारी ता.शिरूर विद्यालयाने पुणे जिल्हा ग्रामीणमध्ये द्वितीय क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे.या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश मुरलीधर सोनवणे व सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे तालुकाभरातून कौतुक होत आहे.शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता,प्रशासन, विद्यार्थ्यांची उपस्थिती,स्पर्धा परीक्षेतील यश आणि उपक्रमशीलतेच्या आधारावर हा सन्मान देण्यात आला आहे.खंडेराय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष दत्तोबा विठोबा भगत,उपाध्यक्ष सूर्यकांत डफळ, सचिव सुनीलभाऊ गायकवाड तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व टीम लीडरचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या शुभेच्छांनी शिक्षकांचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.संस्थेचे अध्यक्ष दत्तोबा भगत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शाळांना नवी दिशा मिळत असून गुणवत्ता उंचावण्यासाठी सकारात्मक स्पर्धा निर्माण होत आहे.न्यू इंग्लिश स्कूल,धामारीचा झालेला हा गौरव इतर शाळांसाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.