शुभम वाकचौरे
जांबूत: शिरूर गावच्या हद्दीत सरदार पेठ येथील स्विटी प्रोव्हीजन स्टोअर्स समोर, हलवाई चौक ते मारूती आळी रोडवर आरोपी कृष्णा वैभव जोशी, रा सरदार पेठ, शिरूर, ता शिरूर जि पुणे याचा फिर्यादींनी त्याचेविरूद्ध इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षापुर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने आरोपीने दारू पिवून फिर्यादीच्या दुकानाजवळ येवून, शिवीगाळ करून जर्किंग मधून एक पिस्तुल बाहेर काढुन फिर्यादींना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने पिस्तुल फिर्यादींचे छातीवर रोखुन “मी तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देवुन पिस्तुलचा खटका दाबत असताना फिर्यादींनी त्याचा हात बाजुला ढकलला. तरी देखील त्याने त्याचे हातामधील पिस्तुलचे वरील बाजुने मागे पुढे ओढत असताना त्यातुन एक गोळी तेथेच खाली रोडवर पडली व फिर्यादींना जीवे ठार मारण्याची धमकी देवुन आरोपी कृष्णा जोशी हा तेथुन पळुन गेला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेवुन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला गुन्हयामधील आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेशित केले.
त्याअनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी कृष्णा वैभव जोशी हा अहिल्यानगर बसस्थानकावरून जोधपुर, राजस्थान येथे जाणार आहे. त्याअनुषंगाने तांत्रिक विश्लेषन व बातमीदारांमार्फत माहीती घेवुन तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची तपास पथके अहिल्यानगर जिल्हयामध्ये रवाना झाली होती. तपास पथकांनी अहिल्यानगर बसस्थानकावर सापळा लावुन आरोपी त्याठिकाणी येताच त्यास शिताफिने ताब्यात घेतले असुन सदरचा गंभीर गुन्हा घडल्यापासुन आठ तासांचे आत आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी कडुन गुन्हयात वापरलेले गावठी बनावटीचे एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस देखील जप्त करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश कॅजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो हवा नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार विनोद काळे, सचिन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, निखील रावडे, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे.