काशिनाथ आल्हाट तमाशा अभ्यासक तमाशा पंढरी नारायणगाव
शिरूर प्रतिनिधी:- शकील मनियार
‘मकर संक्रांतीचा दिवस एकमेकांना तिळगुळ देऊन गोड करण्याचा दिवस’. परंतु संक्रातीचा दुसरा दिवस हा महाराष्ट्रातील तमाशा रसिकांच्या कायम स्मरणात राहिला. तो म्हणजे “राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचे निधन झाल्याचा दिवस . 15 जानेवारी 2002 या दिवशी तमाशा कलेच्या महाराणी विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला.!’ ‘ विठाबाईंच्या’ निधनाची वार्ता वाऱ्याच्या लहरीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. आणि प्रत्येक रसिकाच्या तोंडून न कळत शब्द उमटले, अरे ..रे…रे वाईट झाले….! या तमाशा कलेच्या महाराणीने अखंड आयुष्यामध्ये कलेच्याद्वारे तमाशा रसिकांना मंत्रमुग्ध केले.मकर संक्रातीचा सण आनंदाने जनतेला घेऊ दिला. आणि दुसरा दिवस हा प्रत्येकाच्या स्मरणात राहावा. यासाठी देहलोकीची यात्रा संपवली. ‘खरं तर! काही विभूती जन्माला येतात’. ती आपल्या घराण्याचा ,गावाचा, देशाचा नावलौकिक अजरामर करून जातात. त्यापैकी महाराष्ट्रातील लोककलेच्या आठवणीत कायम राहणारे एक नाव म्हणजे, “राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर” विठाबाईंचा जन्म पंढरपूरमध्ये सन 1935 मध्ये झाला. लाडकी लेक जन्माला आली. वडील भाऊ खुडे यांनी लाडक्या लेकीचे नाव पंढरपुरात जन्माला आली. म्हणून ‘विठा’ ठेवले. नावात सामर्थ्य काय असते? ते विठाबाईंनी जन्माने आणि जगण्याने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले.तिच्या कलेने आपल्यापर्यंत आणि आपल्यापासून भविष्यातील पिढ्यांपर्यंत अजरामर करून लोककलेला आयाम दिला. ‘स्वर्गीय विठाबाईंची लोककला हे सदैव लोककलाकारांना चैतन्याची जननी राहिल”!. ‘ विठाबाईंचे’ वर्णन करताना, फक्त नारायणगाव नाही. फक्त महाराष्ट्र नाही तर, एक भारतीय नृत्यांगना ,उत्तम गायिका, उत्तम अदाकारीची अभिनेत्री, तमाशा क्षेत्रातील उत्तम कलावंत म्हणून त्यांचा साता समुद्रा पलीकडे नावलौकिक झाला आहे.
साहित्य, चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून त्यांच्या जीवन संघर्षाचा मागवा अनेकांनी घेतला आणि तो पुढे अनेकांना आदर्शवत होत राहील. यात शंका नाही. ‘ विठाबाईंच्या’ अंगी असलेले कलागुण आणि त्या कलागुणांना महाराष्ट्रातील नाही तर, देशातील रसिकांनी दिलेले उत्तम साद प्रतिसाद रसिकांच्या मनात आढळ स्थान आहे . या लोककलेच्या महाराणीच्या निधनाला आज 22 वर्ष पूर्ण झाली .परंतु सतत एक ना एक दिवस या महाराणीच्या नावाचा नाम उल्लेख हा प्रत्येक ठिकाणी कलेच्या क्षेत्रात केला जातो आहे .अशी ही तमाशा सम्राज्ञी तमाशा रसिकांच्या मनात आढळ स्थान निर्माण करून गेलीली कलेची महाराणी आहे. “विठाबाईंनी” आपला चेहरा आणि चेहऱ्यावरील भाव, चेहऱ्यावरील अदाकारी, नृत्य आणि हजरजबाब यामुळे रसिकांच्या मनावरती अधिराज्य निर्माण केले होते. ‘गाता गोड गळ्याला एक नवा अविष्कार होता.त्याला साज नृत्याविष्काराचा होता. अनेक वर्ष रसिकांच्या हृदयात घर निर्माण करून गेल्या . “कर्तुत्वान व्यक्ती आपल्या कर्तुत्वाचा पाया पराक्रमातून घालतात , आपल्या पराक्रमाने नवीन कर्माचा पाया घालतात. रक्ताचे पाणी करून, स्वतःच्या कार्याचा विस्तार करतात. दृढनिश्चय बाळगून कार्याला स्थैर्य प्राप्त करून देतात” तो यज्ञ अखंडपणे तेवत ठेवणा-या ‘विठाबाई’ होत्या. त्यांच्या कर्माच्या कर्तुत्वाने त्यांचा कर्तुत्वाचा आलेख हा सातत्याने वाढत आकाशाला भिडला. ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या’ या कर्तृत्वामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. “निस्वार्थीपणे केलेले कार्य, हे नावलौकिक मिळवून देते” त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे तमाशासम्राज्ञी ‘विठाबाई नारायणगावकर’ ‘भारत चीन युद्धाच्या बातम्या रेडिओवरून विठाबाई ऐकत होत्या. मनात येऊन गेलं. मलाही देश सेवा करण्याची संधी सैनिकांसारखी मिळावी.’ ते स्वप्न साखर करण्याचं काम खऱ्या अर्थाने नारायणगावचे ग्रामदैवत माता मुक्ताईने केले. सन 1962 मध्ये भारतावर चीन देशाने आक्रमण केले होते. भारत चीन युद्धाच्या बातम्या रेडिओवरती झळकत होत्या. भारताचे सैनिक प्राणपणाने लढत होते. नेफा आघाडीवरील भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील नारायणगावच्या भाऊ- बापू मांग तमाशा फडाची निवड करण्यात आली. कलेचे जाणते आणि अभ्यासू तत्कालीन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ‘यशवंतरावजी चव्हाण साहेब’ यांनी ही संधी या तमाशा फडाला दिली. तमाशा फडाच्या तमाशा सम्राज्ञी विठाबाईंनी सरकारचा हा मागोवा खऱ्या अर्थाने ग्रामदेवता आई मुक्ताईचा प्रसाद मानून निस्वार्थीपणे स्विकारला.देशाची सेवा आपल्याला करण्याची संधी मिळाली. ही मनस्वी इच्छा प्राप्त झाली.”पोटच्या लहान लहान लेकरा बाळांचा विचार न करता, त्या नेफा आघाडीवर तमाशातील मोजक्या कलाकारांचा संच घेऊन गेल्या.
बर्फाळ प्रदेशामध्ये नेफा आघाडीवर ‘विठाबाईंनी’ आपल्या कलेचा साजशृंगार चढविला. वीरश्री प्राप्त झाली. भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले. त्यांनी गायले…’शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती ….! अशा गोड गळ्याने जवानांच्या हृदयांचा ठाव घेतला. आणि राष्ट्रीय कार्यासाठी भारतीय जवानांना खऱ्या अर्थाने चेतना मिळाली. ‘महाराष्ट्राची ही लोककला ‘तमाशा’ ही पारंपरिक कलाआहे. ‘ अनेक वर्षापासून जतन केली गेली आहे. यासाठी महाराष्ट्र शासन सुद्धा या लोककलेचे संवर्धन करीत आहे. “‘तमाशाच्या गाडीचे एक चाक शक्तीचे तर दुसरे भक्तीचे असते”. तमाशा फडाची राहूटी अथवा तंबू ही खऱ्या अर्थाने एकतेचे प्रतीक आहे “! तमाशात अनेक जाती ,जमातीचे लोक एकत्र रहातात. पण कुठल्याही प्रकारचा मनभेद, वर्णभेद, मतभेद, जातीभेद ,वंश भेद, शैक्षणिक भेद, वैचारिक भेद विरहित एकत्रितपणे राहतात. . लोककलाकार एकमेकांमध्ये एकत्रित गुण्यागोविंदाने राहतात. तमाशा केलच्या क्षेत्रातून शक्ती आणि भक्ती विठाबाईंनी तमाशाच्या वगनाट्याच्या माध्यमातून अनेक वेळा विठाबाईंनी रंगमंचावर महत्व सादर केले .विठाबाईंनी वीररसाचे जेवढे महत्त्व पटवून दिले. करुणा रसातून अभिनय सादर केला . खेड्यातील तमाशा रसिक चातकासारखे विठाबाईंच्या तमाशाची वाट पाहत रहात होते . आजही गावोगावी तमाशा यात्रेच्या काळात तमाशे होतात. पण विठाबाईंच्या तमाशाची आठवण आजही तमाशाच्या जशाच्या तशा आठवणी सांगितल्या जातात. वर्षभर गावाच्या मळानावरती कोणी न गेलेले. परंतु तमाशाच्या निमित्ताने रसिकांनी माळरान फुलून जायचे. शिवार भरलेल्या पिका सारखे वाटायचे.
त्यावेळेस विठाबाईंनी घातलेली गवळणीची साद… आजही लोकांच्या कानामध्ये आहे. ‘ तू ग ऐक नंदाच्या नारी, काल दुपारी यमुनेच्या तीरी…. यमुनेच्या तीरी….. यासारख्या उंच आवाजातील गवळणी विठाबाईंच्या तमाशा रसिकांच्या आठवणीत आहेत. “आज जगाच्या नकाशात लोककलेची संस्कृती जतन व संवर्धन करणारे गाव म्हणजे नारायणगाव” खऱ्या अर्थानं विठाबाईंच्या नावाने कलेच्या क्षेत्रात नारायणगावची ओळख झाली आहे. हे भाग्य फक्त विठाबाईंनाच मिळाले. तमाशाची महाराणी तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या कर्तुत्वाचा मान सन्मान महाराष्ट्र शासनाने जपला. त्यांच्या कलेचा गुणगौरव केला. महाराष्ट्र शासनाने 2006 पासून तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सुरू केला आहे. तमाशा क्षेत्रात भरीव योगदान देणारे, व्यक्तींना जुन्या जाणत्या तमाशा कलावंतांना दरवर्षी ‘विठाबाई जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, आणि दहा लाख रोख रुपये असे या स्वरूप आहे . यावर्षी पाच लाखा ऐवजी दहा लाख रुपये असा बदल यावर्षी करण्यात आलेला आहे.
आत्तापर्यंत तमाशा क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला. त्यापैकी श्रीमती कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, श्रीमती सुलोचना नलावडे, हरिभाऊ बडे नगरकर, मंगला बनसोडे, अंकुश खाडे, भीमा सांगवीकर, गंगाराम रेणके, राधाबाई खोडे नाशिककर ,मधुकर नेराळे ,लोकशाहीर मोमीन कवठेकर, गुलाबबाई संगमनेरकर, अतांबर शिरढोणकर, संध्या माने, हिराबाई कांबळे, अशोक पेठकर, ढोलकी सम्राट जनार्धन वायदंडे यासारख्या अनेक लोक कलावंतांना ‘विठाबाई जीवनगौरव’ पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन्मानित करण्यात आलेले आहे. तमाशा साता समुद्रापार नेणा-या ‘विठाबाई नारायणगावकर: आज आपल्यात जरी नसल्या, तरी कलेच्या रूपाने ते आपल्यामध्ये सातत्याने आठवणी देतात. ‘ देशकार्य लागली टाळी, तेथे देहाती कोण सांभाळी! या उक्तीप्रमाणे देश कार्यासाठी विठाबाईंनी आपला देह झिजवला. कलेच्या क्षेत्रातील महाराणी झाल्या. त्यांच्या स्मृतीला वंदन करताना मनात नेहमी त्यांचे गाण्याचे शब्द वेदनांचे वावटळ उठवतात.. ‘अंगावर घेतलया अंकुराचा साज, अंकुराचा साज | सुखा संग दुःखाचं, घेतलं मी ओझ…| उरामधी निशाणी, उरामध्ये निशाणी ही, सख्या साजनाची, सख्या साजनाची, पोटासाठी नाचते मी, पर्वा कोणाची |?