प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा पालक मेळावा शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी.मोहिते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज प्रबोधनकार प्रा.राहुल पाटील उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते यांनी महाविद्यालयाच्या पालक मेळाव्यात आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले ते पुढे म्हणाले की आजच्या शिक्षणपद्धती मध्ये तसेच तंत्रज्ञानामध्ये प्रचंड बदल होत आहेत.

यासाठी विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी सुद्धा अद्ययावत असणे गरजेचे आहे. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काय करू शकतो याची उदाहरणे प्राचार्य डॉ के सी मोहिते यांनी दिली.वाचन लेखन याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आहाराचे महत्त्वही त्यांनी विशद केले.प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रा.राहुल पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून पालकांनी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे तसेच पालकांनी विद्यार्थ्यांकडून कमाल अपेक्षा करू नये असे आवाहनही त्यांनी केले. शिक्षक हा परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.ब्रेन ओरिएंटेड शिक्षणापेक्षा लाईफ ओरिएंटेड शिक्षण महत्त्वाचे आहे, पालकांचा आदर्श मुलांनी घेतला पाहिजे त्यासाठी पालकांनी धनुष्यासारखे तर विद्यार्थ्यांनी बाणा सारखे असणे गरजेचे आहे असे मत त्यांनी मांडले.

मोबाईलचा अतिवापर हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील अडथळा आहे म्हणून पालकांनी मुलांना मर्यादित वेळेसाठी मोबाईलचा वापर करू द्यावा असे आवाहन कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक अर्जुन वणवे यांनी केले. तसेच इतक्या बहुसंख्येने पालक उपस्थित राहिले त्यासाठी पालकांचे व समन्वयकांचे कौतुक उपप्राचार्य प्रा.हरिदास जाधव यांनी केले सदर कार्यक्रमासाठी १९४पालक उपस्थित होते.पालकांनी आपल्या मनोगतात त्यांच्या पाल्यांमध्ये झालेल्या बदलासाठी महाविद्यालयाचे आभार मानले.महाविद्यालयाविषयी भावना व्यक्त करताना अनेक पालकांना आपले अश्रू अनावर झाले. पुणे शहरातील नामांकित कॉलेजमध्ये ज्या सुविधा नाहीत त्या सुविधा सी.टी. बोरा कॉलेजमध्ये आहेत,अशा कॉलेजमध्ये माझा मुलगा शिकतो याचा मला अभिमान आहे अशा भावना पालक सुनंदा गायकवाड यांनी व्यक्त केल्या.महाविद्यालयातील शिक्षक,शिकविण्याचे काम करता करता विद्यार्थ्यांची वैयक्तिक काळजी घेतात त्यामुळे आम्ही निर्धास्त असतो, असे मनोगत पालक अमितसिंग परदेशी यांनी व्यक्त केले.तसेच रूतुमुखी संघवी,मीना कोल्हे,विलास शिंदे,दादा शेळके,सुरेश कांबळे,या पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.शरद रणदिवे यांनी केले सूत्रसंचालन प्रा.यशस्वीता वारे यांनी केले तर आभार प्रा.रुपाली व्यवहारे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.