‘ शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार
स्वातंत्र्यानंतरही जो समाज दुर्लक्षित राहिला, ज्या समाजाला माणूस म्हणून जगणं आजही असाहाय्य आहे, ज्यांच्या समस्या, वेदना आजही समजून घ्यायला, जाणून घ्यायला कोणीही तयार नाही, त्यांच्यासाठी विकास हा शब्द खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा आहे अशा लोकांना विकासाकडे डोळसपणे पाहायला लावणाऱ्या व अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी मार्गस्थ करणाऱ्या समाजसेविका क्रांती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सुनितताई भोसले यांना ब्रीजस्टोन मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवार्ड २०२४ या नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतातील ४००० संस्थांनी या पुरस्कारासाठी नामांकन भरले होते, त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे दोन व द्वितीय क्रमांकाचे दोन पुरस्कार देण्यात आले यामधील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस क्रांतीसंस्थेला प्राप्त झाले. यापूर्वी या संस्थेच्या अध्यक्षा सुनीता भोसले यांनी आपल्या समाजाची व्यथा आपल्या ‘विंचवाचं तेल’ या पुस्तकात प्रखरपणे मांडल्या आहे, या पुस्तकालाही जवळ जवळ ५० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आदिवासी समाजातील भिल्ल, पारधी या समाजाला आजही भटकंती करावी लागते. ज्या ठिकाणी ते राहतात त्या जागा आजही त्यांच्या नावावर नाही, बऱ्याच लोकांकडे जातीचे दाखले नाहीत, आधार कार्ड नाही अशा लोकांना शासनाने तयार केलेल्या आराखड्यातील लाभ मिळणार कसे? हे मिळवून देण्यासाठी क्रांती संस्थेने गेल्या वीस वर्षापासून प्रयत्न केले त्यातून अनेक लोकांना मदत झाली.
शिरूर तालुक्यातील तहसीलदार पिसाळ साहेब यांच्याशी चर्चा करून आदिवासी समाजातील लोकांना आजही मतदानाचा अधिकार नाही, यासाठी मतदान कार्डचे कॅम्प आयोजित करण्याचे त्यांना आवाहन केले. ससंस्थेच्या माध्यमातून मतदान कार्ड नसलेल्या लोकांचे सर्वेक्षण केले या सर्वेक्षनात जवळजवळ दोन हजार लोकांना मतदान कार्ड नसल्याचे समजले .या ठिकाणी त्वरित कॅम्प लावून जवळजवळ दोन हजार लोकांचे मतदान कार्ड काढण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून झालं. आज ज्या लोकांची वय ७५ ते ८० च्या दरम्यान आहेत त्या लोकांनी आयुष्यातील प्रथम मतदान आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत केल आहे. भटक्या विमुक्त तसेच आदिवासी भिल्ल आणि पारधी समुदायासोबत क्रांतीसंस्था विविध विषयावर सक्षमीकरणाचे कार्यक्रम मागील १४ वर्षांपासून राबवत आहे. संस्थेच्या कामात या भटक्या समाजात सोबत तसेच आदिवासी समाजासोबत काम करण्यासाठी समाजाचे योगदान आवश्यक आहे.सोबतच समाजाचे पाठबळ या कामी आवश्यक आहे या अवॉर्डच्या प्राप्ती मधून आम्हाला नैतिक बळ निश्चित मिळाले आहे परंतु संस्थेचे जे मुले तसेच महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम राबवत आहे, यासाठी सामाजिक स्तरावर सहकार्य आवश्यक आहे. संस्था शिक्षण, आरोग्य, नागरिकत्वाचे पुरावे, अन्याय, अत्याचार, घरगुती हिंसाचार, लिंगाधारीत भेदभाव, जातीयवाद निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी ही सक्रियपणे कार्य करत आहे. या सर्व कामाची पोहोच पावती म्हणूनच क्रांती संस्थेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सन्मानाच स्वरुप पाच लक्ष रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्काराची सर्व रक्कम आपण आदिवासी मुलांच्या वसती गृहासाठी वापरणार आहोत. लवकरच या वसतीगृहाचं काम सुरू करणार आहोत या साठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे.या कामी व आपलाही हतभार आम्हाला आवश्यक आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा समता भोसले यांनी पुरस्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
हा पुरस्कार सर्व विमुक्त जाती व आदिवासी समुदाय तसेच सर्व महापुरुष यांना समर्पित करीत आहे असे या सुनिता भोसले यांनी सांगितले.
या पुरस्कारा प्रसंगी संस्थेच्या वतीने सुनिताताई भोसले, अविनाश भोसले व अनिल तुळसे सर उपस्थित होते.