शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार
खिंवसरा पाटील विद्या मंदिर मधील इ. ४थी ते ७ वी च्या वर्गातील निवडक १६ विद्यार्थ्यांसाठी किवळे गावात क्षेत्रभेटीचे आयोजन सहशिक्षिका योगिता गायकवाड व स्मिता जोशी यांनी केले होते. यावेळी २२वर्षांपासून मोठमोठ्या गणेशमंडळांच्या आकर्षक गणेश मूर्ती रंगविण्याचे काम करणारे, साम टि.व्ही.ने सुद्धा ज्यांच्या कामाची दखल घेतलेले अनुभव संपन्न कलाकार गौतम गायकवाड यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली.या मुलाखतीमधून विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारुन ह्या व्यवसायाचे स्वरुप जाणून घेण्याचा प्रयत्न केला.मूर्ती रंगविताना लागणारी एकाग्रता,सलग लागणारी बैठकीची स्थिरता,विविध रंगांची सौंदर्यदृष्टी,मूर्ती साकारल्यानंतर मिळणारे आत्मिक समाधान आनंद या गोष्टी गणरायाचीच कृपा असल्याचे व्यावसायिक कलाकार गौतम गायकवाड यांनी सांगितले तसेच पत्नी मंगला गायकवाड,चिरंजीव प्रशांत गायकवाड ,सून अमृता गायकवाड या कुटुंबातील सदस्यांचा आणि कारागीरांचा खूप मोठा पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या माहितीमुळेच शाळेने पिं.चिं.मनपा तर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणे स्पर्धेत सहभाग घेतला.यावेळी ३ सप्टेंबर राष्ट्रीय गगनचुंबी इमारत दिवसाचे औचित्य साधून किवळे गावातील गिनी विवान्ते या अत्याधुनिक भव्य अशा गृहप्रकल्पाला विद्यार्थ्यांना भेट देता आली.बांधकाम करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी,आवश्यक कच्चा माल,नियोजन आराखडा,इमारत प्रतिकृती याविषयी तेथील अभियंते,व्यवस्थापक यांनी माहिती दिली. बांधकामाचे आधुनिक स्वरुप पाहून आम्ही सुद्धा असे मोठ्ठे घर घेवू असा निर्धार काही विद्यार्थ्यांनी केला तर काहीजण आम्ही यासारखे कुशल वास्तुविशारद होवू असा आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच श्रावणी सोमवारच्या निमित्ताने श्रीमंत पेशवे यांचे मामा सेनापती त्रिबंक नारायण पेठे यांनी सन१७३५ मध्ये बांधलेल्या ऐतिहासिक पुरातन शिवमंदिराला विद्यार्थ्यांनी भेट देवून तेथील रचना सौंदर्य समजावून घेतले. तसेच किवळे गावातील ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीमंत विष्णू रामचंद्र रानडे यांचा वाडा देखील विद्यार्थ्यांना बघता आला. जुने बांधकाम,वाड्याची रचना,लाकडी कोरीवकाम असलेले दरवाजे पाहून विद्यार्थी आश्चर्यचकीत झाले. या क्षेत्रभेटी दरम्यान साधना गायकवाड यांनी बनवलेल्या चविष्ट गरमागरम पुलाव, जिलेबीने सर्वांचा पोटोबा तृप्त केलाच पण त्यांच्या हसतमुख आदारातिथ्याने विद्यार्थ्यांच्या मनात नकळत आपुलकीचे नाते तयार झाले. अशाप्रकारे व्यावसायिक क्षेत्रभेट,हिरव्यागार निसर्गातील पावसाळी सहल अशा दोन्ही आनंददायी गोष्टींचा संगम या उपक्रमातून साध्य झाला.
या उपक्रमासाठी सागर गायकवाड यांचे बहुमोल सहकार्य तर मुख्याध्यापक नटराज जगताप यांचे प्रोत्साहन लाभले.व्हिडिओ निर्मितीमध्ये कृतिका काळे व पार्श्वगायन प्रज्ञा फुलपगार यांनी केले.