शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षक दिन हा दिवस आनंदाचा दिवस . शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.जीवनाला चांगला आकार देण्याचे काम शिक्षक नेहमीच करत असतात . ज्या ज्या व्यक्तींनी उच्च ध्येय गाठले त्या सर्वांच्या पाठीशी शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे . शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी जर विद्यार्थ्यांनी अंगीकारल्या तर यश मात्र नक्कीच मिळते. यांची अनेक उदाहरणे सांगता येतील.
शिक्षकांचे महात्म्य फार पूर्वीपासून आजपर्यंत आहे. शिक्षकांच्या विषयी आदराची भावना मनामध्ये असणे गरजेचे आहे. कला ,क्रीडा ,साहित्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी ,प्रशासकीय अशा कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.आई,वडिल ,शिक्षक आपल्याला नेहमीच चांगला मार्ग दाखवत असतात त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आपण अंगिकारल्या तर यश मिळणारच. नम्रता हा दागिना आहे. तो प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणे गरजेचे आहे.शिक्षकांच्या विषयी आदराची भावना असणे गरजेचे आहे. निस्वार्थ पणाने शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा राग न येऊन देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे . व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त करण्यासाठी चुका दुरुस्त करणे गरजेचे असते . काही विद्यार्थ्यांना काय चांगले काय वाईट हे शालेय जीवनात समजत नाही शिक्षकच त्या चुका आपल्याला दाखवून देत असतात जे विद्यार्थी त्यामध्ये बदल करतील त्यांना प्रगती करणे सहज शक्य होते.आयुष्यामध्ये पुढे जायचे असेल प्रगती साध्य करायची असेल, उच्च ध्येय प्राप्त करायचे असेल तर शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी पडते .आज शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाला आहे. पण आजही शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना आहे. शैक्षणिक साधने पूर्वीच्या काळी कमी होती आज शैक्षणिक साधने वाढलेली आहेत परंतु त्याच बरोबर करमणुकीची साधने पण वाढलेली दिसतात .शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुलांसाठी महत्वाचा संदेश विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळणे गरजेचे आहे. अवांतर वाचनाची आवड निर्माण करून महान व्यक्तींचे आत्मचरित्र अभ्यासल्यावर आपणास अधिकचे ज्ञान प्राप्त होईल . प्रयत्न, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम यांच्या जोरावर यश खेचून आणता येईल. त्यासाठी चांगला सहवास महत्त्वाचा आहे .आयुष्यात चांगल्या मित्रांचा सहवास मिळणे गरजेचे आहे. कारण व्यक्ती हा सहवासात बऱ्याच गोष्टी शिकतो. पालक ,समाज यांनी शिक्षकांचा आदर केल्यानंतरच विद्यार्थ्यी शिक्षकांचा आदर नक्कीच करतील.
आज कोणतेही क्षेत्र पहा त्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर मार्गदर्शनाची गरज असते आणि ते मार्गदर्शन योग्य मिळवायचेच असेल तर मार्गदर्शक शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे . आयुष्यामध्ये शिक्षकांचे स्थान हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात शिक्षकांचाआदर करावा. माझ्या आयुष्यात अगदी लहानपणापासून मला ज्या ज्या शिक्षकांनी घडवले त्या शिक्षकांबद्दल नेहमीच आदराची भावना ठेवली. कारण शिक्षकांपेक्षा कोणीच मोठा नसतो. आज कोणते क्षेत्र पहा त्या क्षेत्रात व्यक्तीने मिळवलेले यश हे शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच सहज शक्य झाले आहे .मी स्वतःला भाग्यवान समजतो मला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. चांगल्या गोष्टी साध्य करायच्याअसतील तर शिक्षकांच्या सहवासात राहूया जीवन आनंदी करण्यासाठी एक पाऊल पुढे उचलूया स्वतःला चांगल्या सवयी लावून घेऊया. जास्तीत जास्त वाचन करून ज्ञान प्राप्त करूया .
या जगामध्ये अशक्य अशी कोणतेही गोष्ट नाही त्यासाठी प्रयत्न ,जिद्द ,प्रखर इच्छाशक्ती ,चिकाटी,कठोर परिश्रम,शिस्त , जिज्ञासुवृत्ती, दूरदृष्टी, सकारात्मक विचार आवश्यक आहे. आपल्या क्षमता ओळखून त्या क्षमतांचा विकास करून चांगले छंद जोपासून जीवन आनंददायी करूया. शेवटी माझ्या शिक्षकांसाठी कवी वि .वा .शिरवाडकर यांच्या कवितातील शेवटच्या दोन ओळी मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा | शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक बांधवांना हार्दिक शुभेच्छा. संतोष परदेशी सर-श्री वाघेश्वर विद्याधाम शाळा मांडवगण. फराटा .ता.शिरूर जि.पुणे (राज्य कार्याध्यक्ष निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण, निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य)