जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ऐतिहासिक नाणेघाटात पावसाळी पर्यटकांच्या स्वागतासाठी स्थानिक प्रशासन व ग्रामस्थ सज्ज झाले आहे,मात्र नाणेघाट परिसरात वर्षाविहार,भटकंती व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी जबाबदारीने वागण्याची आवश्यकता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.तसेच, हुल्लडबाजीवर नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी होत आहे. घाटघर ग्रामस्थ व वनव्यवस्थापन समितीने शनिवारपासून दि:-२९ जून नाणेघाटाकडे जाणाऱ्या पर्यटकांकडून उपद्रव्य शुल्काची आकारणी देखील सुरू केली आहे.नाणेघाट परिसरातील कोकणकडा याठिकाणी काही प्रेमी युगुलांकडून भरदिवसाअश्लील चाळे केले जातअसल्याचे आढळून आले आहे.अनेक वेळा मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणारे तरुण-तरुणी देखील आढळून येतात.निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याचा त्रास होतो. निसर्गप्रेमी पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
घाटघर येथे ब्रिटिश काळापासून पोलिस चौकी आहे.जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घाटघर परिसरासाठी नियुक्त आहेत,मात्र इकडे कधी फिरकत नसल्याचे नगरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात परिसरात हुल्लडबाज पर्यटकांवर बसण्यासाठी येथे पोलिस कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी माजी सरपंच पोपट रावते यांनी केली आहे. :-कचऱ्यामुळे निसर्गाचे पावित्र्य धोक्यात-: या वर्षीच्या वर्षाविहाराला सुरुवातीलाच पर्यटक नाणेघाट परिसरात आनंद घेण्यासाठी येत आहेत. परिसरात अनेक व्यावसायिक आपले स्टॉल लावतात. हॉटेल व्यवसायदेखील चांगल्याप्रकारे होत असतो. येथे कचऱ्याचे कोणतेही व्यवस्थापन केले जात नाही. त्यामुळे पर्यटकांनी टाकून दिलेला प्लास्टिक कचरा व दारूच्या बाटल्यांमुळे नाणेघाटातील निसर्गाचे पावित्र्य धोक्यात येणार की काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे.याचाच परिणाम वन्यजीव आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.