जुन्नर तालुका प्रतिनिधी :-रविंद्र भोर
श्री.क्षेत्र उदापुर ते श्री.क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी श्री.चैतन्य महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान हरिनामाच्या व टाळ मृदुंगाच्या गजरात अत्यंत भाविक वातावरणात शुक्रवार दिनांक २८ जून रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात झाले.या वर्षी पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान उदापुर गावातील केशव रघुनाथ शिंदे(उद्योजक) व काळभैरवनाथ ग्रामसंघ,मुंबई यांच्या गुरू-माऊली या बैल- जोडीस मिळाला आहे.या बैलजोडीची निवड श्रावणात नागपंचमीच्या ग्रामविकास मंडळा व श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वार्षिक सभेत केली जाते.त्यानुसार निवड समितीकडून करण्यात आली.या निवड वेळी उदापुर ग्रामपंचायत चे सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य, श्रीराम देवस्थानचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य, बैलजोडीचे मालक व त्यांचे सर्व कुटुंब,सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व संस्थांचे पदाधिकारी, परिसरारातील वारकरी आणि मोठ्या संख्याने ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता श्री.क्षेत्र उदापुर नगरीत पालखी सोहळ्याला हरि भजनाने सुरुवात झाली.त्यापूर्वी मुबंईकर मित्र मंडळ यांनी पालखी रथ विविध सुंदर व आकर्षक फुलांनी सजविण्यात आला गुरू-माऊली ही बैलजोडी देखील गोंडस दिसत होती. प्रथेप्रमाणे पालखी सोहळा सावता महाराज मंदिराच्या समोरच सोहळ्याला सुरुवात करून मुख्य बाजार पेठेतून आकर्षक काढलेल्या रांगोळ्या वरून भक्तिगीते,हरिभजने गात आणि संगीत बँडच्यागजरात सरकत होत्या,यावेळी महिला वारकरी व पुरुष वारकरी यांच्या फुगडयांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यानंतर अनेक दानशूर व्यक्तींनी विविध प्रकारची फळे,खिचडी,चहा इत्यादी गोष्टींची वाटप करत पालखीला निरोप देत होते.यावेळी वरूण राजाने हजेरी लावून सर्वाना आनंदीत केले. बैलजोडी निवड उदापुर ग्रामविकास मंडळ नागपंचमीच्या जाहीर सभेत करीत असतात.यावर्षी सर्व समावेशक निर्णयाने उदापुर गावातील उद्योजक म्हणून सध्या मुंबई येथे कार्यरत असलेले केशव रघुनाथ शिंदे व काळभैरवनाथ ग्रामसंघ मुंबई यांना मान देण्यात आला.त्यानंतर बैलांचे परीक्षण पालखी सेवा मंडळाचे विश्वस्त दत्तात्रय कुलवडे,रविंद्र शेटे निवडक पदाधिकारी करतात.यात बैलाचे वय,उंची, छाती,वशिंड,रंग,शेपटी,खुरे,शिंगे,कांती,चाल क्षमता,या गोष्टींची पाहणी केली जाते.या शिवाय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र घेण्यात येते. त्यानुसार मानकरी मंडळींनी एक महिन्यांपूर्वी आहिल्यानगर येथून गुरू-माऊली या जोडीला दोन लाख एकविस हजार रुपयांना खरेदी केले आणि त्यांची योग्य पध्दतीने काळजीपूर्वक देखरेख करून सुनियोजित आहार,परिपूर्ण आराम मिळाल्याने गुरू-माऊली यांचे देखणेपण व रुबाबदारपणा सर्वांच्या नजरा खिळून ठेवतात. श्री.चैतन्य महाराज पालखी सोहळा हा जुन्नर, आंबेगाव,खेड या तीन तालुक्यातील वारकरी संप्रदाय तसेच जनतेच्या सहकार्याने गेली ६५ वर्षे अविरत सुरूअसून शुक्रवार दि:-२८ रोजी सकाळी उदापुर येथून विधिवत पूजा झाल्यानंतर हा पालखी सोहळा रथ मिरवणुकीने तुकाराम महाराजांच्या गुरू असलेले बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधीस्थळ असलेल्या ओतूर गावातुन वाजतगाजत पायी वारीने पंढरपूर क्षेत्राकडे प्रस्थान झाले.