जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
जगभरातून गुंफल्या गेलेल्या स्नेहनात्यांची विण शिवजन्मभूमीत घट्ट झाली.मैत्रीसमूहाच्या निमित्ताने, बॉर्डरलेस पैंथर्स,नवोदित कवी,लेखक व साहित्यिक यांना एक हक्काच व्यासपीठ निर्माण करून देणारा, तसेच विधायक समाजहिताच्या हेतूने निर्मिण केलेल्या व्हाटसअप ग्रुपचा हा स्नेह मेळावा शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या कावेरी लॉन्स येथे पार पडला. शिवशौर्य गाथेच्या जागरासह,वृक्षारोपण करून मेळाव्याचा प्रारंभ झाला.जुन्नरच्या भटकंतीतील वाटाडे असलेले इतिहास अभ्यासक विनायक खोत, डॉ.अमोल पुंडे,विजय कोल्हे यांनी शिवचरित्राचा महिमा आणि शिवनेरीची परिपूर्ण माहीती समूह सदस्यांना दिली.
आयोजित मेळाव्यात महाराष्ट्र गीत,दिपप्रज्वलन,गुरुकुल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सादर केलेले शिवछत्रपतींच्या चरित्राचा जागर करणारे शिवछत्रपती फ्युजन नृत्य,मायभाषेची प्रतिज्ञा, काव्यवाचन सोहळ्याचे आकर्षण ठरले.या निमित्त समूहात सहभागी झालेल्या ठिकठिकाणच्या जावयांचा अधिक मासचे निमित्ताने धोंडेवाण आणि अनारशांचा स्नेहस्वाद देऊन सत्कार करण्यात आला. या समूहातील ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य आणि मुंबई दूरदर्शनचे माजी संचालक अशोक डुंबरे, उद्योजक रमेश डुंबरे यांच्यासह ठाणे येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण कबाडी,रमेश हांडे,झरीना खान, विनायक खोत,डॉ.ज्योती तनपुरे,डॉ.सदानंद राऊत, डॉ.लहू गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली.समूह सदस्य डॉ.प्रवीण डुंबरे यांनी लिहीलेल्या मोरपंख या काव्यसंग्रहाचे प्रकाशन यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सदस्य अशोक डुंबरे आणि भिमाजी सुकाळे यांच्या हस्ते झाले.
ज्येष्ठ दांपत्य दशरथ अण्णा कवाडी आणि विजया कवाडी यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे दुपारच्या सत्रात महाराष्ट्रभरातून आलेल्या या ग्रुपच्या नामवंत कवींचे कवीसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.. ह.भ.प. सदाकाळ नाना आणि भरत काशिद यांच्या सुश्राव्य भजनाने अधिकच रंगत आणली. डॉ. सीमा शिंदे, नंदूशेठ भोर, देवीदास तांबे, जालिंदर उकीर्डे, रवि येरंडे, संतोष वाळेकर, पोपट नलावडे, संजय गवांदे, डॉ. अमोल पुंडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण कवाडी यांनी संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. ग्रीन व्हिजन फाऊंडेशन, लायन्स क्लब ओतूर,
जुन्नर तालुका मित्रमंडळ, वनराई बहुउद्देशिय संस्था सायकल ग्रुप ओतूर यांचे विशेष सहकार्य लाभले. सुत्रसंचालन संजय गवांदे यांनी केले. आभार पोपटराव नलावडे यांनी मानले.
बॉर्डरलेस पैंथर्स हा आमच्या सारख्या वयोवृद्धांना नवीन जीवन जगण्याचा दृष्टीकोन देणारी प्रेरणा आहे. तर युवा, तरुणांना विधायकतेचा संस्कार जपण्याचा सकस समूह झाला आहे. :-अशोक हुंबरे, माजी संचालक, मुंबई दूरदर्शन:-
-:जावयांच्या सन्मानाचे वेगळेपण:-विविध ठिकाणहून आलेले जावई यांना अनारशाचे पक्वान्न जेवणाची पंगत वाढून, तर त्यांना अधिक मासाच्या वाणाची भेट देऊन ज्येष्ठ समूह सदस्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. मराठमोळ्या संस्कृतीचा एक आगळा आविष्कार या निमित्ताने पहायला मिळाला. तसेच भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेले अनोखे रक्षाबंधन लक्षवेधी ठरले.
-:मदतीचा ओघ देणारा समूह:-बॉर्डरलेस केवळ व्हाटसअप गृप नाही, तर तो गरजूंच्या मदतीचा ओघ आहे. ही माहीती यावेळी देण्यात आली. १०वीत उत्तुंग यश मिळवलेल्या श्रावणी डुंबरे हीला अनेक समूह सदस्यांनी आर्थिक योगदान देऊन तीच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला आहे. तीच्या शैक्षणिक देखभाल करणाऱ्या राजेंद्र संभूस यांच्यासह तीचा विशेष सत्कार करण्यात आला. १२ वीत पहिल्या आलेल्या गरजवंत साहिल ठिकेकर या विद्यार्थ्याची इंजीनियरिंग प्रवेशासाठी ७२ हजारांच्या शैक्षणिक शुल्काची गरज भागविण्यात आली असून अशा अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यासाठी साधारण दीड लाख रुपयांची ठेव समूहाकडे जमा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.