शुभम वाकचौरे
सामाजिक बांधिलकी जोपासत माझी माती माझी माणसं प्रतिष्ठान थिटेवाडी केंदूर दरवर्षी समाजातील वंचित घटकांसाठी अनेक उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक वर्ष सुरू होताच समाजातील गरीब,होतकरू,वंचित विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानाने शालेय साहित्याचे तसेच मिठाईचे वाटप केले.प्रतिष्ठान कोणत्याही स्वरूपात देणगी किंवा शासकीय मदत न स्वीकारता हे कार्य करत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून सोमवार दि.१७ जून २०२४ रोजी स्वप्नवेध अनाथालय पारगाव मंगरूळ ता.जुन्नर जि.पुणे येथे प्रतिष्ठानचे खजिनदार तानाजीराव थिटे व सचिव कमलावती थिटे यांच्या आदेशाने वह्या पेन व इतर शालेय साहित्य तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले.
माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या या अनोख्या आणि मोठ्या सहकार्याबद्दल स्वप्नवेध अनाथालयाचे प्रमुख सचिन भोजने यांनी समाधान व्यक्त केले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जिजाबाई थिटे यांनी या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा जीवनातील सर्व कष्ट विसरायला लावणारा असल्याचे यानिमित्ताने सांगितले व समाजातील विविध घटकांनी अशा अनाथ मुलांच्यासाठी काम करण्याचे आवाहन या निमित्ताने केले. या येत्या वर्षभरात पर्यावरण तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये वंचितांसाठी काम करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सविता थिटे यांनी सांगितले कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे,महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद शिरूर तालुका संपर्कप्रमुख शुभम वाकचौरे उपस्थित होते.