जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील उत्तरे कडे मांडवी नदीच्या खोऱ्यातील कोपरे,माळेवाडी,काठेवाडी,कुडाळवाडी, जांभूळशी,मांडवे,मुथाळणे,फोफसंडी आदी गावात हिरडा गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.यामध्ये शाळकरी मुलेही उन्हाळी सुट्टी असल्याने आपला शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी आई-वडिलांसोबत हिरडा गोळा करण्यात व्यस्त आहेत.मांडवी नदीच्या खोऱ्यात मालकीची व जंगलामध्ये हिरड्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
गेल्या सहा वर्षापासून आदिवासी विकास महामंडळाने हिरडा खरेदी योजना बंद केली होती ती सन २०२४ पासून पुन्हा चालू करण्यात आल्याने आदिवासी हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.आर्थिक वर्षे सन २०२४ मध्ये बाळ हिरडा या वस्तूचे प्राथमिक दर हे प्रति किलो १७० रुपये प्रमाणे हमीभाव महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे.खरेदी करण्यात येणाऱ्या बाळ हिरड्याचे मोबदला (पेमेंट) हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात येणार असल्याने ही प्रक्रिया अतिशय किचकट आहे, कारण अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड संलग्न नसल्याने आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्याने,तसेच बँकेत केवायसी अपडेट नसल्याने, हे पैसे कधी खात्यात जमा होतील याबाबत निश्चित माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलेली नाही.आदिवासींचे अर्थकारण हे हिरड्यावर अवलंबून असते. हिरड्याचा मोबदला हातात जर रोखीने दिला तर शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण,शेतीची बियाणे,दैनंदिन व्यवहार,पुढे चार महिने पावसाळ्यामध्ये हाताला रोजगार नसतो,ही कामे करण्यासाठी अतिशय सोयीस्कर होईल,त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणे पुन्हा रोखीने हिरडा खरेदी करावी अशी मागणी या भागातील हिरडा उत्पादक शेतकरी सुनील कवटे,नाना कुडळ,किसन बांगर, मच्छिंद्र सोनवणे,रामदास दाभाडे,अंकुश माळी, सिताराम झापडे,तुकाराम काठे ,यांनी केली आहे.
*आयुर्वेदात महत्व*
हिरड्याचे बाळ हिरडा व मोठा हिरडा असे दोन प्रकार पडतात बाळ हिरड्याला आयुर्वेदिक औषधांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. तसेच रंग बनवण्यासाठी चामड्याच्या वस्तू बनवण्यासाठी याचा उपयोग होतो.
*कुकडेश्वर सहकारी हिरडा कारखाना श्रेयवादामुळे रखडला*
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे सर्व पक्षाचे उमेदवार मतदान मागण्यासाठी दारोदारी फिरत आहे. हिरडा कारखाना चालू करतो अशी खोटी आश्वासने देऊन मतदान आपल्या पदरात पाडण्याचा ऑटोकाठ प्रयत्न करत आहे.निवडून आल्या नंतर मात्र तोंडाला पाने पुसतात. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आदिवासींच्या प्रश्नांना नेहमीच बगल देत असते. “लालफितीच्या” व श्रेयवादामुळे या कारखाना निधी मंजूर नसल्याने कितपत पडून जैसे थे आहे.
बाळ हिरडा गोळा करणे अत्यंत जोखमीचे काम आहे.जीवावर उदार होऊन पोटासाठीआदिवासी शेतकरी हंगामात बाळ हिरडा गोळा करत असतात. आदिवासींकडे कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने बाळ हिरडा गोळा करण्याचे काम करतात.
ज्योती कवटे –
(महिला शेतकरी कोपरे)
जंगलात वाढणाऱ्या हिरड्यांच्या झाडावरून हिरडा झोडून काढणे, वेचणे,तो उन्हात वाळवणे, अशा प्रकारची कष्टाची कामे आदिवासीना करावी लागतात. हिरडा काढण्यासाठी उशीर झाला तर त्यात “बी”तयार होते त्यामुळं खूप कमी बाजारभाव मिळतो असतो. त्यामुळे हिरडा वेळेतच काढून घ्यावा लागतो.
युवराज माळी
(हिरडा उत्पादक शेतकरी,कोपरे जुन्नर)