जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील माळशेज पट्ट्यातील उत्तरेकडील या पश्चिम आदिवासी भागातील शेतकरी हे पुढच्या वर्षीचे भाताचे पीक घेण्यासाठी जमिनीच्या मशागती पूर्वीची प्रक्रिया म्हणजे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने जमीन भाजणीच्या कामाची लगबग आदिवासी शेतकऱ्यांची सुरू झाली आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे या भागातील मुख्य पीक भातपीक असल्याने हे भातपीक निघाल्यानंतर जवळपास वर्षभर ७०% त्या जमिनी म्हणजे खाचरे पडीक राहतात.दरम्यानच्या कालावधी ३०% जमिनीमध्ये गव्हाळी, हरभरे,कडू वाल,गोडे वाल फरशी आणि काही प्रमाणात कडधान्य पिकविली जात आहेत त्यामुळे ७०%जमिनीत अनेक प्रकारचे जीवजंतू व म्युकर्स तयार होतात.हे जीव जीवजंतू कोवळ्या भातरोपांना हानीकारक ठरतात.तसेच या जमिनीमध्ये भातबियाणे पेरल्याने लागवडीसाठी भाताचे उत्तम रोप तयार होते व हे रोप उपटण्यास सोयीस्कर जात असल्याने आदिवासी शेतकऱ्यांकडून अशाप्रकारे जमिनी भाजल्या जात असल्याचे ठिकठिकाणी दिसत आहे.
आदिवासी शेतकरी भातशेतीमध्ये पेरणी अगोदर भात रोपांची मशागत करतो.पारंपरिक आदिवासी भाषेमध्ये या जागेस ‘रोमठा’ असे म्हणतात या सपाट केलेल्या जमिनीवर भाजणीसाठीराख,शेणखत,झाडांखालील वाळलेला पालापाचोळा, जनावरांनी न खाल्लेले गवत,वाळलेले जनावरांचे शेण खाचरांमध्ये पसरवले जाते.त्यानंतर ते पेटवले जाते हे सर्व शेतामध्ये धुपत-धुपत पेटते ठेवण्यासाठी त्यावर गवत व माती टाकून ते बराचकाळ पेटते ठेवले जाते. यामुळे जमिनीला पूर्णपणे उष्णता मिळून जमीन चांगल्या प्रकारे भाजून निघाल्याने भाताचे पीकचांगले येते.