जुन्नर तालुका प्रतिनिधी:- रविंद्र भोर
शिरूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत जुन्नर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर नियुक्त दोन हजार ४०४ कर्मचाऱ्यांना जुन्नर येथे दोन दिवस निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये एकूण ६३२ केंद्राध्यक्ष व एक हजार ७७२ इतर मतदान अधिकारी यांचा समावेश होता.प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रिया,ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत तसेच श्री शिवछत्रपती महाविद्यालयात ईव्हीएमचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसह निवडणूक कर्मचारी यांनी मतदान केंद्रावरील विविध प्रसंग व त्याच्या कायदेशीर तरतुदी याबाबतचे नाटकीय रूपांतर हे प्रशिक्षणाचे विशेष आकर्षण ठरले.यावेळी सेवानिवृत्तीला एक वर्ष असतानाही निवडणूक कार्यावर असणाऱ्या तसेच विविध शारीरिक व्याधी तसेच अपंगत्वावर मात करून निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या निवडणूक अधिकारी,कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
निवडणुकीचे प्रशिक्षण उपजिल्हाधिकारी तथा साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाडगे, तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी घेतले.यावेळीनिवासी नायब तहसीलदार सारिका रासकर,निवडणूक नायब तहसीलदार सुधीर वाघमारे,महसूल नायब तहसीलदार किरवे यांच्यासह तलाठी,मंडल अधिकारी व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी प्रशिक्षणाचे नियोजन केले.कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे कामकाज अत्यंत जबाबदारीने पार पाडावे.कर्तव्य पार पाडत असताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिकात संबंधितांनी सहभागी व्हावे.मतदान प्रक्रिया निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्या- साठी मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले कर्तव्य पार पाडावे,असे आवाहन घाडगे यांनी केले.मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे कर्तव्य व अधिकार याबाबत तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी माहिती दिली.