जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या जोरदार वादळी वाऱ्यामुळे जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथे घराला आणि गोठ्याला आग लागल्याची घटना सोमवार दि:-१५ एप्रिल रोजी घडली.
गोद्रे येथील भिमाजी रेंगडे यांच्या घराशेजारील असलेल्या गवतावर विजेची ठिनगी पडून हि आग घराच्या दिशेने आली.ही आग विझवण्यासाठी भीमा बुधा रेंगडे व त्यांच्या पत्नी फसाबई भीमा रेंगडे यांनी धाव घेतली.मात्र जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी पसरली.ही आग घराच्या दिशेने येत घर आणि घराच्या
लगत असलेल्या गोठ्याला लागली.या आगीच्या घटनेत भीमा रेंगडे आणि फसाबई रेंगडे या देखील काही प्रमाणात भाजल्या आहेत.यासोबतच यात एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला.
सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे उडणाऱ्या ठिणगीमुळे गवतावर आग लागली. सुरुवातीला ही आग लहान होती,परंतु वाऱ्याच्या तीव्रतेमुळे ती झपाट्याने पसरली आणि घरापर्यंत पोहोचली.घर आणि गोठ्यात जनावरे होती. आग इतकी प्रचंड होती की जनावरांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही.
आगीमुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.त्यासोबतच अन्न धान्यांचाही मोठा साठा जळून खाक झाला आहे.दरम्यान,या घटनेतील जखमींना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र रुग्णाची प्रकृती पाहता ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.