जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय सतिशदादा मोटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) राजुरी आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सव व भव्य पालखी मिरवणूक सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात आणि स्वामीमय वातावरणात संपन्न झाला.
स्वामी प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले होते.दिंडोरीप्रणित श्री स्वामी सेवा मार्गाचे एकमेव कीर्तनकार भगूर रत्न ह भ प श्री गणेश महाराज करंजकर यांनी स्वामी चरित्राचे सार सर्व सेविकाऱ्यांना व उपस्थितांना अनेकविध दाखले देऊन समजावून सांगितले.
सकाळी भूपाळी आरतीने या सोहळ्यास सुरुवात झाली.त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर षोडशोपचार पूजा व सामुदायिक अभिषेक संपन्न झाला.पालखीचे स्वागत प्रत्येक दारा मध्ये सडा,रांगोळी व पायघड्या घालून करण्यात आले.उपस्थित सेवेकऱ्यांना सेवाकेंद्रातील प्रतिनिधीकडून मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर सुमारे १७५ सेवेकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये सामुदायिक हवनयुक्त स्वामीचरित्र पारायनामध्ये सहभाग घेतला.सायंकाळी पालखी आणि मिरवणूक सोहळ्या दरम्यान पारंपारिक नऊवारी साडी नेसून डोक्यावर कलश,तुळशीचे वृंदावन घेतले होते.बालसंस्कार विभागामार्फत नवनाथाची नऊ रूपे वेशभूषा केलेली बालके अतिशय सुंदर दिसत होती.
महिला फुगड्या खेळत,काही डोक्यावर कलश,तुळस घेऊन अभंगा च्या तालावर नाचत होत्या.हा सुख सोहळा स्वर्गी नाही;पालखी सोहळ्यात सहभागी झालेले सर्वच भाग्यवान असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित स्वामी सेवेकऱ्यांनी दिली.श्री स्वामी समर्थ महाराजांची नैवेद्द आरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मोठ्या जल्लोषात घेण्यात आली.केंद्रातील प्रतिनिधिंनी स्वामी मार्गाविषयी व १८ विभागाचे मार्गदर्शन केले व बालसंस्कार वर्गाबद्दल माहिती दिली.मंदिरामध्ये महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमासाठी राजुरीतील भाविक व ग्रामस्थांची लक्षनीय उपस्थिती होती.