(रमेश खरमाळे यांनी दिले किल्ले संवर्धनाचे धडे, मोहिमेत प्लॅस्टिक व इतर कचरा केला गोळा)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,वडगाव बुद्रुक,पुणे मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी किल्ले शिवनेरी येथे भेट दिली.या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत प्लॅस्टिक व इतर कचरा गोळा केला.
या यावेळी जुन्नर वनविभाग येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवनेरी भूषण व इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर रमेश खरमाळे यांनी विद्यार्थ्यांना किल्ले संवर्धनाचे धडे दिले.किल्ला पाहत असताना कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत याबाबत बोलताना किल्ले शिवनेरीवरील गणेश दरवाजा व त्याचे बांधकाम,शिवाई देवीचे पुरातन मंदिर, १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा ज्या ठिकाणावरून झाली त्या ठिकाणाचा इतिहास, किल्ल्यावर असलेले पुष्करणी हौद,किल्ल्यावर असलेल्या विविध वाटा याबाबत सखोल माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना निसर्गाचे संवर्धन व इतिहासातील वस्तूंचे जतन करण्याची शपथ देण्यात आली.सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.डी.लोखंडे उपप्राचार्य डॉ.वाय.पी.रेड्डी, इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ.एम.बी.माळी,इंडस्ट्रियल व्हिजिट समन्वयक गणेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यास भेट दिली.विद्यार्थ्यांसमवेत प्रा.तुषार काफरे प्रा.सुवर्णा रोहिले प्रा.सपना कांबळे यांनी या सहलीचे आयोजन केले होते.