माळशेज प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पिंजरा लावलाय! त्यात बिबट्या जेरबंद झालाय! बिबट्या पकडून नेलाय म्हणजे तेथील भय संपले असा भ्रम तयार होतो व माणुस गैरसमजुतीत राहतो. खरे तर बिबट पकडला गेला तर तेथे अधिक धोका निर्माण होतो.एरवी सतत वावरणाऱ्या बिबट्यास तेथील सर्व गोष्टी अवगत असतात.त्या परिसरावर त्या बिबट्याने आपला मालकी हक्क मिळविलेला असतो. तेथील माणसांच्या सवयी पण त्याला पुरेपूर माहित झालेल्या असतात. खायचे कुठे? पाणी कुठे प्यायचे? आराम कुठे करायचा? या सर्व गोष्टी त्यास परिचित असतात. त्यामुळे शक्यतो तेथे अघटीत घटना क्वचितच घडतात.
परंतु एकदा का तेथील बिबट्या जेरबंद केला व तेथून घेऊन गेलात की आठवड्या भरात तेथे त्या जेरबंद बिबट्याची जागा घ्यायला नवीन बिबट्या येतो. हा निसर्गाचा नियम आहे,नवीन आलेल्या बिबट्यास त्या नवीन परीसरातील वरील गोष्टी माहीत नसतात अशा वेळी बिबट्याकडुन अपघात होण्याची शक्यता जास्त वाढते.आपणास माहीत असेलच की नवीन बाईक किंवा चारचाकी कुण्या पाव्हण्याची दारात उभी राहिली की कुत्रा त्या वाहनांच्या टायरचा वास घेतो. त्यावर तो कुत्रा मुत्र विसर्जन करून तो ते वाहन मार्क करतो. ते वाहन पुन्हा दारापुढे आले की तो कुत्रा भुंकत नाही.
तसेच बिबट्या आपले मुत्र विसर्जन करुन तो आपला परीसर मुत्र विसर्जन करत तो परीसर सतत फिरत परीसर मार्क करत असतो. त्या वासाने त्याच्या एरीयामध्ये दुसरा बिबट्या येत नसतो. परंतु बिबट्या पकडून नेला की तेथील येणारा मुत्राचा वास आठवड्याभरात नाहीसा होतो. मग तेथे दुसरा बिबट्या ती जागा भरून काढण्यासाठी येतोच. तो नवीन आलेला बिबट्या आपला एरीया मार्क करायला सुरुवात करतो. तेव्हा अशा वेळी अपघात घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, कारण त्याची व आपली प्रथमतःच भेट घडलेली असते. आपण त्यास अनोळखी असल्यामुळे त्या बिबट्याला असुरक्षितता वाटते व तो आपल्या वर झडप घालण्याची शक्यता असते. त्यामुळे मित्रांनो अशा वेळी अधिक काळजी घ्या व सतर्क राहा.खास करून जेथे बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावून तेथील बिबट्या जेरबंद झाला असेल त्यांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगली जावी व परिसरातील नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने आपण सुरक्षित राहाल व होणारे अपघात टळतील.असे मत माजी सैनिक रमेश खरमाळ यांनी व्यक्त केले आहे.