जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील मौजे उंब्रज नं:- १ या ठिकाणी या अगोदर दोन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश मिळाले असून सोमवार दि:-१८ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिसरा बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली.उंब्रज येथील चार वर्षाच्या आयुष शिंदे या बालकावर अलीकडेच बिबट्याने जबरदस्त जीवघेणा हल्ला करून गंभिर स्वरूपात जखमी केले होते.आयुषच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले आहे.
दरम्यान मौजे उंब्रज नं;-१ या ठिकाणी आयुष शिंदे यांच्या घराच्या चारी बाजूंनी असणाऱ्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी १० पिंजरे व १० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत, तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या दोन टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत.रेस्क्यू टीमचे लोकही उंब्रज आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तळ ठोकून गस्त देखील घालत आहेत.
दरम्यान वन विभागाने शुक्रवारी पकडलेला बिबट्या हा आयुष शिंदे या बालकावर हल्ला करणारा आहे का? अथवा नाही? याबाबतचा खुलासा अद्यापतरी झालेला नाही.आणि आता तिसरा बिबट्या देखील वन विभागाने पकडला असून सदर बिबट्या मादी बिबट असून वय वर्षे चार ते पाच आहे माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बिबट्याने आयुषवर हल्ला केला त्या ठिकाणच्या बिबट्याच्या पाऊल खुणाचे ठसे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने घेतलेले आहेत.
माणिकडोह निवारा केंद्रात दाखल करण्यात आलेल्या बिबट्याच्या पंजाचे देखील ठसे घेतले जाणार असून ठसे जुळवणी केली जाणार असून ते जुळतात किंवा नाही त्यानुसार आयुषवर हल्ला करणारा याच तीन बिबट्यापैकी आहे का ? याबाबतचा खुलासा होऊ शकेल, असे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.
यावेळी मौजे उंब्रज नं:-१आणि परिसरामध्ये अद्यापही ९ ते १० बिबटे असावेत,असा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.उंब्रज परिसरामध्ये आयुष शिंदे या बालकावर हल्ला करणारा बिबट्या जोपर्यंत सापडत नाही,तोपर्यंत वनविभागाची सगळी फौजफाटा व यंत्रणा याच ठिकाणी ठेवली जाणार असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले आणि कोणत्याही परिसरामध्ये बिबट्या संदर्भात काही उपद्रव दिसून आल्यास वनविभागाच्या स्थानिक कार्यालयाशी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा जुन्नर येथील वनविभागाच्या कार्यालयाची संपर्क साधून याबाबतची तातडीने माहिती द्यावी असे आवाहन देखील सातपुते यांनी केले आहे.