जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेल्हे-शिरूर या महामार्ग क्रमांक ७६१ साठी ३८६ कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला असून लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. जुन्नर तालुक्याच्या हद्दीतून जाणारा बेल्हे- शिरूर महामार्ग क्रमांक ७६१ याची दुरावस्था झाल्याने प्रशासनाकडे शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नर शिवजन्मभूमीचे आमदार अतुल बेनके, पारनेरचे आमदार डॉ.निलेश लंके व शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी सातत्याने या रस्त्यासाठी आवाज उठून पाठपुरावा केला होता.तसेच हा महामार्ग नगर,पुणे, नाशिक, कल्याण,मुंबई,संगमनेर,आळेफाटा या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून दररोज हजारो वाहने या मार्गावरून महामार्गावरूनधावत असल्याने, या महामार्गाचे रुंदीकरण होणे गरजेचे होते.
या महामार्गावर अगोदरही कामे झाली आहेत, परंतु पुलांची उंची, रस्त्याचे मजबुतीकरण, उच्च दर्जा, उन्नतीकरण व दहा मीटर रुंदीकरणासाठी अतिरिक्त निधीची मागणी करताना डॉ. विखे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्यांच्या मागणीला यश येऊन ३८६ कोटी रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचेसमजले. या महामार्गाच्या रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम पुणे विभागातील सर्व अधिकाऱ्यांनीही भरपूर कष्ट घेतले असून या सर्वांच्या मागणीला व पाठपुराव्याला यश येऊन भरघोस निधी मिळाल्याने व महामार्गाच्या कामाच्या मंजुरीमुळे रस्ता दळणवळणाच्या समस्या सुटणार आहे.