जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
महाराष्ट्रात राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध महामार्ग तयार केले जात आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात कल्याण ते लातूर दरम्यान एक नवीन मार्ग विकसित होणार आहे.
या महामार्गामुळे कोकण आणि मराठवाडा हे दोन महत्त्वाचे विभाग परस्परांना जोडले जाणार आहेत. सध्या स्थितीला कल्याण ते लातूर हा ४५० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी दहा तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागतो. कल्याण ते लातूर हे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी नवीन महामार्ग बांधण्याची संकल्पना मांडली आहे.हा मार्ग कल्याण येथून सुरू होईल.पुढे हा मार्ग माळशेज घाटात प्रवेश करेल.
माळशेज घाटात या प्रकल्प अंतर्गत तब्बल आठ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाईल. या बोगद्याने पुढे अहमदनगरला जाता येईल. मग तेथून पुढे बीड, मांजरसुंबा, अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत हा महामार्ग संपणार आहे. या मार्गामुळे कल्याण ते लातूर हा प्रवास चार तासात पूर्ण होईल. म्हणजेच प्रवाशांचा सहा तासांचा कालावधी वाचणार आहे.या महामार्गा- साठी पन्नास हजार कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाचा प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव आता सरकार- कडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.