निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
मांडवगण फराटा ता. शिरूर जि.पुणे येथील शामराव आत्माराम परदेशी व उषाबाई यांच्या पोटी माझा जन्म झाला. वडील (आबा )गंवडी काम करायचे ,आम्ही तीन भावंडे मी सर्वात लहान मोठा मुकुंद (नाना) मधला कवी प्रा. मनोहर (बापू).मी लहान असताना छप्परांचे घर होते. घरी लाईट नव्हती. चिमणी व कंदील यावरच अभ्यास करावा लागत असे. संध्याकाळी कंदील लावला की आई पाया पडायला सांगे. दिव्याला पवित्र मानत असल्यामुळे तिने ही सवय लावली. आजही घरामध्ये लाईट लावल्यानंतर पाया पडण्याची सवय तेव्हापासून लागलेली.
आबा सायकलवर अगदी ३०-३५ किलोमीटरवर गवंडी काम करायला जायचे. त्यामुळे त्यांना घरी यायला उशीर होत असे. कधी कधी आम्ही जेवण करून झोपी जात. आम्ही पोटभरून जेवण केले आहे का याची ते खात्री करत. त्याची खुप इच्छा आपली मुले शिकली पाहिजे स्वतः चे जुनी ११ पर्यंत शिक्षण झाले. शिक्षक म्हणून लागलेली नोकरी त्यांच्या घरगुती अडचणीमुळे त्यांना सोडावी लागली.गंवडी काम करत असतानाच चांगल्या लोकांचा सहवास त्यांना मिळत गेला. गवंडी काम करत असताना खूप कष्ट व त्रास सहन करावा लागला. आपल्या आयुष्याला आलेला हा त्रास आपल्या मुलांच्या आयुष्यात येऊ नये म्हणून आपण आता मार्ग बदलला पाहिजे. शेतकरी झाले पाहिजे, बागातदार झाले पाहिजे .
मनामध्ये आलेला हा विचार लवकरच त्यांनी प्रत्यक्षात उतरवला. शेती खरेदी करून गवंडी काम सोडले आणि शेतीला सुरुवात केली. ऊसाचे पीक शेतामध्ये ढोलु लागले. मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे हाच मनात विचार सतत त्यांच्या येत होता. गवंडी काम करत असताना सिमेंट मुळे फुटलेले हात आजही त्यांच्या कष्टाची जाणीव करुन देतात. आपल्या मुलांना सावलीत काम मिळाले पाहिजे. मुलांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांनी सावलीत पैसे कमवावेत असे त्यांना नेहमी वाटे .आपले आयुष्य उन्हातानात राब राब राबण्यात गेले.तुम्ही मात्र चांगले शिक्षण घ्या तुम्हाला कोणतीच गोष्ट कमी पडून देणार नाही असे ते नेहमी सांगत. त्यांनी पाहिलेले स्वप्न आम्ही तिघेही भावंडे नोकरीला लागून पूर्ण झाले.मी शिक्षक झाल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.त्यांच्या आनंदाला पारा उरला नाही.ते म्हणाले आज मी पाहिलेले स्वप्न पूर्ण झालं.कष्ट केल्यावर कोणतीच गोष्ट कमी पडत नाही. चांगले वागणे ,इतरांचा आदर करणे असा मोलाचा सल्ला ते नेहमी देत आहेत. आबांचा मित्रपरिवार मोठा आहे .प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे असे ते सांगत आहेत.
पैसा म्हणजे सर्वस्व नाही पैशाला जास्त महत्व देण्यापेक्षा माणुसकीला महत्त्व द्या .दुसऱ्याच्या मदतीला आपण धावून गेल्यास लोक आपल्या मदतीला येतात हे अनुभवातूनच ते सांगतात. आपला जन्म कोणाच्या घरात व्हावा हे आपल्या हातात नाही परंतु ज्या घरात आपण जन्माला आलो त्या घराचा उद्धार करणे गरजेचे आहे. आम्ही लहान असताना आबा अंगणात आम्हाला बोधकथा सांगायचे. पावसाळ्यात मात्र आमचे छप्पर गळायचे.आई रात्रभर जागी असायची ज्या ठिकाणी पाणी पडत असे त्या ठिकाणी भांडी लावायची. भांडी भरली की पाणी बाहेर टाकणे हे काम ती रात्रभर करायची. घरातील कोपऱ्यात आम्ही झोपी जात. स्वयंपाक करताना आम्ही आईजवळच बसत असे. पावसाळ्यात चूल पेटवताना आईला खूप त्रास होत असे. सरपण ओले असल्यामुळे त्या लाकडाचा धुर होई.
अशा परिस्थितीतही आम्हाला आमच्या आवडीचे जेवण बनवत.सकाळी लवकर उठून आमचा डबा बनवत. वडिलांचे मित्र ,घरी आलेले पाहुणे,ऊस तोड कामगार, टोळी मुकादम, ट्रॅक्टर ड्रायव्हर यांना ही ती चुलीवरच स्वयंपाक करून आनंदाने जीव घालत. कधीही कामाचा कंटाळा केला नाही. सतत काम करत असे आजही तिला कामात आनंद वाटतो. शेळी ,गाई यांचे पालन आम्ही लहान असल्यापासून ते आजपर्यंत करत आहे. कामात राम असतो हे तिचे ठरलेले वाक्य . तिचे शिक्षण फारसे झाले नाही पण वाचणाची तिला फार आवड. एखादे काव्य आवडले की ती चाल लावते. तिच्या अनेक चारोळ्या पाट आहेत. या सर्व गोष्टी जवळून पाहिल्यामुळे आजही त्यांच्या कष्टाची जाणीव सतत राहते . वयस्कर व्यक्तींना पैशापेक्षा मानसिक समाधाची गरज असते. त्यांच्याशी दोन गोष्टी प्रेमाने बोलले की त्यांना आनंद होतो. त्यांचे विचार अनुभव आपल्याला शिदोरी आहे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव प्रत्येकानेच ठेवायला हवी. आजही त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन सतत उपयोगी पडते. सकाळी त्यांचे दर्शन घेऊनच माझी कामाची सुरुवात होते.
भाग्यवान समजतो अशा आई-वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला. त्यांच्या संस्कारामुळेच शिक्षकी पेशा सांभाळत १४५हून अधिक संस्काराचे जीवनातील महत्त्व व पर्यावरणाचे महत्त्व या विषयावर व्याख्याने देता आली. तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण , प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्यकार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. वडीलधाऱ्याचे आशीर्वाद , कठोर परिश्रम घेतले तर अशक्य असे काहीच नाही ही शिकवण त्यांनी दिली .नम्रता हा दागिना आहे तो सतत बरोबर ठेवा असे ते नेहमी सांगतात.
संतोष शामराव परदेशी(एम.ए.बी.एड.डी. ॲग्री) अध्यापक श्री वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा ता.शिरुर.जि.पुणे.
मो.9923563302