जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,बेल्हे आयोजित “समर्थ युवा महोत्सव २०२४” नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाला.
या युवा महोत्सवाची सुरुवात शोभायात्रा व ग्रंथ दिंडीने करण्यात आली.हातामध्ये वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा तुकोबा या नावाचा जयघोष करत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईची पालखी फुलांनीसजवली होती.सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या हस्ते दिंडीचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती या सुप्रसिद्ध गाण्याने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. सुप्रसिद्ध शिव– व्याख्याते व प्रेरणादायी वक्ते प्रा.नितीन बानगुडे पाटील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना म्हणाले की,आम्ही निर्णय घेण्याची वेळ आली की कारणं सांगतो आणि कृती करण्याची वेळ आली की आम्ही सबबी सांगतो.गरीब असणं ही श्रीमंत होण्यासाठी मिळालेली उत्तम संधी आहे.बुद्धी कमी आहे याचा अर्थ विद्वान होण्यासाठी मिळालेली ती एक उत्तम संधी आहे.स्वतःच्या कमतरतांना बलस्थाने बनवा आणि त्या बलस्थानांच्या बळावर स्वतःच्या कर्तुत्वाचा ध्वज फडकवा.हेच यशाचे सर्वात मोठे सूत्र असल्याचं बानगुडे पाटील यावेळी म्हणाले. साधनं महत्त्वाची नसून साधना महत्त्वाची आहे . ध्येयाच्या आड सबबी आणू नका.प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करा मग पहा यशाचा मार्ग कसा तुमच्यासाठी खुला होईल.
सुप्रसिद्ध हास्य अभिनेता,नकलाकार “हास्यजत्रा फेम” योगेश सुपेकर यांनी विद्यार्थ्यांना विविध कलाकारांचे व राजकारणी व्यक्तिमत्त्वांचे हुबेहूब आवाज काढून निखळ मनोरंजन केले लोककवी प्रशांत मोरे यांच्या भावस्पर्शी कवितांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आई वडिलांविषयीच्या मायेची जाणीव जागृत झाली.प्रथमेश मोरे यांच्या सुमधुर वादनाने हिंदी व मराठी गीत कार्यक्रमात रंगत आणली.प्रा.गणेश शिंदे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने जीवन कसे सुंदर आहे याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला.शिवराज अष्टक मालिकेतील चित्रपट गायक अवधूत गांधी यांनी पावनखिंड,सुभेदार,हिरकणी,फत्तेशिकस्त या सुपरहिट चित्रपटातील सुमधुर गीत गायनाने शिवरायांची महती विद्यार्थ्यांपुढे मांडली.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख नृत्य दिग्दर्शक सागर रोकडे यांनी विद्यार्थ्यांपुढे बहारदार नृत्य सादर करून वेगवेगळ्या नृत्य शैलीचे दर्शन घडवले.
यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारा,आजादी ७५,उत्सव महाराष्ट्राचा ,आनंद गाणी ट्रिब्यूट टू इंडियन सिनेमाज,कलर्स ऑफ इंडिया,रामायण या वेगवेगळ्या प्रकारच्या थीमला अनुसरून सांस्कृतिक कार्यक्रमांचा कलाविष्कार सादर केला.या समर्थ युवा महोत्सवाला तालुक्याचे आमदार अतुल बेनके व माजी आमदार शरद सोनवणे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले.खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते उत्कृष्ट समहू गीते सादर करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना ढाल देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, क्रीडा संचालक एच पी नरसूडे सर तसेच सर्व विभागातील प्राचार्य,विभाग प्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि जवळपास ५००० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार बीसीएस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप यांनी मानले.