शुभम वाकचौरे
जांबूत ता: शिरूर जांबूत येथे व्यसनमुक्ती, तणाव मुक्ती व आर्थिक सक्षमता या विषयांवर पवित्र शास्त्र आधारित प्रवचन आणि मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन कैवारी फाउंडेशन जांबुतच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पा. दानियल शिंदे बोलत होते की व्यसनी व्यक्ती स्वतःच्या भावनांवर, विचारांवर नियंत्रण गमावून बसते.व्यक्तीला मुळात काही स्वभाव दोष, मानसिक विकार असतील तर ते उफाळून येतात.
बोलण्यातली सुसंगती बिघडते. वागण्यातला तोल बिघडतो. अशी वागण्या बोलण्यातील ताळतंत्र गमावलेली व्यक्ती आपलं सामाजिक जीवन त्रासाचं करुन घेते. कुटुंबातील इतर सदस्यांना त्या वागण्याचा त्रास होतो. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला उपचारासाठी व्यसनमुक्ती केंद्रात आणणं बऱ्याच वेळा कठीण असतं. कारण चर्चेत लक्षात येतं की काही व्यक्तींना भीती असते की व्यसन केलं नाही तर आपल्याला झोप लागणार नाही, हातापायांचा थरकाप झाल्यामुळे काम होणार नाही, अस्वस्थ वाटेल, चिडचिड होईल, त्रास होईल म्हणून आपल्याला व्यसन सोडता येणं कठीण आहे, असं त्यांना वाटतं. मात्र व्यसनातून मुक्त होण्यासाठी इच्छाशक्तीची मोठी गरज असते. व्यसन सोडताना जो त्रास व्यसनी व्यक्तीला होतो त्याला उपचारांनी ते कमी करता येतात आणि व्यसन सोडणं सोपं जातं, शक्य होतं. याची खात्री पटली की काही लोकं औषधांची, डॉक्टरांची मदत घ्यायला तयार होतात. अशा लोकांना औषधोपचार आणि समुपदेशन या दोन्हींच्या मदतीने चांगले उपचार करणं शक्य होतं. ज्या व्यसनी व्यक्ती डॉक्टरांकडे येण्यासाठी तयार नसतात त्यांच्यासाठी देखील वेगळे पर्याय सुचवले जातात. व्यवस्थित उपचारांनंतर काही लोक पूर्णपणे व्यसनमुक्त राहू शकतात. तर काही लोक पुन्हा वेगवेगळ्या कारणांमुळे पुन्हा पुन्हा व्यसनांकडे वळण्याची शक्यता असते. कारण फक्त मनाचा निश्चय करुन व्यसनमुक्त होणं सगळ्यांना जमत नाही. त्यासाठी विचारसरणीमध्ये आणि जीवनशैलीमध्ये बरेच बदल करावे लागतात. हे बदल घडायला वेळ लागतो आणि तोपर्यंत व्यसनमुक्त राहण्यासाठी अशा व्यक्तीला काही दिवस व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांनी फायदा होऊ शकतो.