प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
शिक्रापूर विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी ता.शिरूर या ठिकाणी तीन दिवस विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान रांगोळी स्पर्धा, विज्ञान वकृत्व स्पर्धा, कोन बनेगा विज्ञानपती अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष वैशाली विजयराज दरेकर, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सारिका भानदास हरगुडे, शिक्षण तज्ञ गणेश दरेकर, विद्यालयाच्या प्राचार्या राधिका मेंगवडे यांच्या हस्ते वैज्ञानिक प्रयोगातून करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयातील एकूण २२० विज्ञान उपकरणे सादर झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदविला प्रत्येक उपकरणाच्या पाठीमागे असणारे शास्त्रीय तत्व त्याचप्रमाणे त्याचे उपयोग विद्यार्थी पाहुण्यांना आवर्जून सांगत होते. विज्ञान प्रदर्शनाबरोबरच विद्यालयांमध्ये विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली या प्रश्नमंजुषा स्पर्धेमधून कौन बनेगा विज्ञानपती अशी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा विद्यालयात राबविण्यात आली. त्यामध्ये सार्थक वांडेकर हा यावर्षीचा विज्ञानपती विद्यार्थी ठरला. रांगोळी द्वारे विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक आकृत्या रेखाटल्या आणि त्यांची कल्पकता या रांगोळी द्वारे दिसून आली.
विज्ञान वत्कृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील विविध विषयावर भाषणे केली. विद्यालयामध्ये विज्ञानाची जागृती होऊन विद्यार्थ्यांच्या कल्पक जनतेला वाव देण्यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेचा लाभ गावातील ग्रामस्थ, पालक वर्ग यांनी घेतला. विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक संभाजी ठुबे, शैला दरेकर, माधुरी दरेकर, सुप्रिया दरेकर, अजित पंचरास, तुषार जाधव, ओंकार रोकडे, वर्षा डफळ, नलिनी गवारे यांनी परिश्रम घेतले व विद्यालयातील इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.