मंगलवाद्यांच्या गजरात दिग्गजांना देणार मानवंदना
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
शिवजन्मभूमीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सन १८३९ पासूनच्या प्रदिर्घ कालखंडातील प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या दिग्गजांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेणारा ‘शिवनेरीची श्रीमंती’ हा ग्रंथ शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नंदलाल लाॅन्स, ओतूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध प्रकाशन ग्रंथाली प्रकाशित संजय नलावडे लिखित ‘शिवनेरीची श्रीमंती’ या माहितीपूर्ण पुस्तकाला प्रयोगशील लेखिका आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ. मंदाताई खांडगे यांची विस्तृत आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. देदीप्यमान कामगिरी बजावलेल्या एकूण अडतीस व्यक्त्तिरेखांचा समावेश ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकात आहे. या व्यक्तीरेखा वाचल्यानंतर प्रस्तावनेत लिहिताना, ‘कोणतंही व्यक्तीचित्रण वाचताना त्या व्यक्तीचा जीवनपट चलतचित्रासारखा डोळ्यांसमोर उभा करण्याची ताकद लेखकाजवळ हवी, ती किमया स्तंभलेखक संजय नलावडे यांना साधली आहे’ असे डॉ. मंदाताई खांडगे लिहितात. सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भमूल्य असलेले ‘शिवनेरीची श्रीमंती’ हे पुस्तक भावी पिढीसाठी आणि अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे.
सर्वदूर पसरलेले निखळ निसर्गसौंदर्य आणि वैविध्यपूर्ण समृद्धता जुन्नरचं वैभव आहेच परंतु प्रतिभासंपन्नतेची अफाट श्रीमंती शिवजन्मभूमीच्या या परिसराला लाभली आहे. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि शिवतेजाने शिवनेरीचा हा संपूर्ण परिसर झळाळून निघाला. ज्ञानोबा – तुकोबांच्या जयघोषाने दुमदुमलेल्या आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरी परिसरातील प्रत्येक गावागावात असे प्रतिभासंपन्न सुपुत्र जन्माला आले आहेत, ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा सातासमुद्रापार उमटवला आणि जुन्नर हे नाव जगभर पोहोचविले. म्हणूनच या पुस्तकाला ‘शिवनेरीची श्रीमंती’ असे नाव देण्यात आले आहे असे लेखक संजय नलावडे यांनी सांगितले. ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकात अशी माणसं भेटतील जी आपल्याला बलवान बनवून आपल्यात समृद्ध जीवनाचा अंकुर रूजवतील. यातील प्रेरक व्यक्तीरेखांमध्ये आयुष्य उन्नत करण्याची क्षमता आहे, प्रसंगी त्या व्यक्तीरेखा आपल्याला हसवतात, रडवतात, प्रोत्साहित करतात, प्रेरणा देतात आणि घडवतात सुद्धा!
जगप्रसिद्ध चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांचे अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळांकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी शिवनेरीची श्रीमंती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केलेल्या ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकातीलच सौ. संगीता जोशी, मराठीतील पहिल्या स्त्रीगझलकार, द. स. काकडे, ज्येष्ठ कादंबरीकार, सीए डॉ. एन.बी. चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक, अशोक डुंबरे, दुरदर्शन निर्माते, वसंतराव पोखरकर, उद्योजक, डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अभ्यासक, भास्कर हांडे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार या दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला शिवजन्मभूमी आणि परिसरातील अनेक लेखक, कवी, डॉक्टर, पत्रकार, उद्योजक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकातील लेखक संजय नलावडे यांनी साकारलेल्या सर्व अडतीस व्यक्तिमत्वांना आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मंगलवाद्य आणि तुतारीच्या निनादात मानवंदना देण्यात येणार आहे.