जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्वीच्याच जागी उभारले जाणार असून त्यासाठीचा आराखडा एसटी महामंडळ येत्या आठ दिवसांत देणार आहे. त्यानुसार महामेट्रोकडून स्थानक उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानकाच्या कामामुळे त्या जागेवरील एसटी स्थानक सध्या वाकडेवाडी येथे एक वर्षांपूर्वी हलविण्यात आले आहे. आता शिवाजीनगर स्थानकाचे काम पूर्ण झाल्यामुळे वाकडेवाडीतील एसटी स्थानक या जागी केव्हा येणार,या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.तसेच स्थानक उभारणीचा खर्च कोणी करायचा,या बाबतही वादंग होता.राज्य सरकारने मध्यस्थी केल्यावर,एसटी स्थानक उभारण्याचा खर्च महामेट्रो करेल,असे ठरले.या पार्श्वभूमीवर स्थानकासाठीचा आराखडा एसटी महामंडळ सात दिवसांत देणार आहे.
त्यानंतर स्थानक पूर्वी उभारण्याच्या कामाला प्रारंभ होईल.”या बाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी चर्चा झाली आहे,”अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.महा– मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावणे हर्डीकर म्हणाले,”एसटी स्थानक महामेट्रो उभारणार आहे. एसटी महामंडळाकडून आराखडा मिळाल्यावर त्या बाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कामाला प्रारंभ करू. त्यानंतर लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी आणि महामेट्रोच्या खर्चात बांधण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला आहे.या बाबत काँग्रेसने सहा ऑक्टोबर रोजी आंदोलन केले होते.