विद्यार्थ्यांनी स्वकौशल्याने बनविले आकाश कंदील.
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
दिवाळी हा रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो. या सणाच्या निमित्ताने प्रत्येक जन आपल्या घरासमोर पणती, दिव्यांची आरास करतात. तसेच अंगणात किमान एक तरी आकाश कंदील लावतात.परंतु वर्षानुवर्षे आपल्या पिढ्यांचे भविष्य घडविण्याचे पवित्र कार्य करत असलेल्या,घरोघरी ज्ञानाचा दिवा लावत असलेल्या आपल्या आश्रम शाळेत मात्र रोषणाई किंवा आकाश कंदील कोणी लावताना दिसत नाही.
म्हणूनच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सोनावळे ता- जुन्नर जिल्हा पुणे येथील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त शाळे- साठी प्रत्येकी एक एक शोभेची पणती आणि आकाश कंदील तयार केले आहेत.विशेष म्हणजे हे आकाश कंदील फेकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचा आणि कागदाचा वापर करून बनविले आहेत.शाळेत एक मातीचा किल्ला देखील बनविला आहे.
दिवाळीच्या सुट्टीला जाण्यापूर्वी शाळेत आकाश कंदील लावण्याचा त्यांचा मानस आहे यासाठी विद्यार्थ्यांना शाळेचे अधिक्षक एच.बी.गेजगे यांनी मार्गदर्शन केले.या अनोख्या प्रकल्पाबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड,शाळेचे मुख्याध्यापक बी.आर.लोखंडे व कर्मचारी वृंद, शाळा व्यवस्थापन समिती,तसेच सोनावळे गावाचे सरपंच सुखदेव रावते, उपसरपंच,पोलीस पाटील सर्व पालक आणि ग्रामस्थ यांनी कौतुक केले.