जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
गेट टुगेदर म्हटले की वर्गमित्र-मैत्रिणी, गप्पा-गोष्टी, संगीत – गाणी हास्याच्या फैरी, – दिमतीला रुचकर मेन्यू, कुठेतरी रिसॉर्ट किंवा पर्यटनस्थळी जाण्याची संधी.फारतर सर्व मित्रांनी शाळेला भेट द्यायची आणि फोटो काढायचे वगैरे वगैरे मात्र खोडद ता:-जुन्नर येथील महात्मा फुले विद्यालयाच्या १९९२ च्या बॅचने समाजापुढे नवा पायंडा घालून दिला आहे. त्यांनी येणेरे येथील १०० शेतकऱ्यांना गमबूट भेट दिले या परिसरात विषारी सापांची संख्या वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत होते आणि म्हणूनच वर्गमित्रांनी हा उपक्रम राबविला. गेल्या महिनाभरात येणेरे गावात ६ व्यक्तींना सर्पदंश झाला आहे. त्यात एकामहिलेचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती वनरक्षक रमेश खरमाळे यांना येणेरेचे सरपंच अमोल भुजबळ यांनी दिली.त्यांनी ही बाब त्यांच्या १९९२ बॅचच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली आणि लगेचच निर्णय झाला.गेट टुगेदरचा अति- रिक्त खर्च टाळून येणेरेत १०० गमबूट द्यायचे.त्यानुसार तत्कालीन वर्गशिक्षक एस. बी. सोमवंशी, बी. एस.लोखंडे, व्ही. डी. दाते, ए. के.डोंगरे, के. एस. थोरात, बी.डी.पवार, देशमुख आदी शिक्षकांसह उपसरपंच जितेंद्र ढोले,चेअरमन लक्ष्मण ढोले,ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष उल्हास नवले,मीनल ढोले, सुषमा चवरे, ज्योती काळे, रवींद्र भालेकर, विनोद देवकर, बापूसाहेब जठार आदींच्या उपस्थितीत येणेरेतील १०० शेतकऱ्यांना गमबूट देण्यात आले.तसेच, ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना आपटावृक्षाची रोपे भेट दिली.