ओझरला निर्माल्यातून सुगंधी अगरबत्तीची निर्मिती.
जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
ओझर, ता:-जुन्नर येथील श्री विघ्नहर गणपतीसाठी भाविकांनी अर्पण केलेले हार,दूर्वा,फुले यांसारख्या निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्तीचीनिर्मिती करण्याचा उपक्रम विघ्नहर गणपती देवस्थानच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे.दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्या माध्यमातून निर्माण केलेल्या अगरबत्त्यांचा लोकार्पण सोहळा गणेश महाराज वाघमारे,ओझर गावच्या सरपंच तारामती कर्डक,देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी,विश्वस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. “या पुढील काळात या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे निर्माल्यापासून प्रदूषण होणार नाही, तसेच कचरा इतरत्र पसरणार नाही,निर्माल्य पाण्यात विसर्जित केले जाणार नाही.भाविकांनी भक्तिभावाने श्री विघ्नहर चरणी अर्पण केलेले फुले,दूर्वा,हार यांचे पावित्र्य जतन करण्याचे काम देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून होणार आहे,”असे वाघमारे महाराजांनीसांगितले.” त्यावेळी बाळासाहेब कानडे यांनी या पर्यावरण पूरक उपक्रमाबाबत देवस्थानचे विशेष कौतुक केले. त्या माध्यमातून येणाऱ्या पैशाचा उपयोग देवस्थानच्या विकासासाठी होणार आहे.अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली. ट्रस्टचे विश्वस्त कैलास मांडे व सेवक शेखर कवडे यांनी सूत्रसंचालन केले.विश्वस्तांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.