जुन्नर प्रतिनिधी : – रविंद्र भोर
ओतूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ओतूर पोलिसांनी वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा दंड करून बेशिस्त वाहन चालक सुधारत नसल्याने आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली आहे.
दारू पिऊन वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा मागील सहा महिन्यापासून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या १७५ वाहन चालकांवर कारवाई केली अशी माहिती पोलीस निरीक्षक कांडगे यांनी दिली. बेशिस्त वाहन चालवणे,मद्यपान करून वाहन चालवणे ,मोबाईलवर बोलत वाहन चालवणे,स्टंट करणे, नागमोडी वळणे घेत वाहन चालवणे,भरधाव वेगाने वाहन चालवणे,असे जर ओतूर पोलिसांच्या निदर्शनास आले तर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याने वाहन चालकांनी शिस्तीचे व नियमाचे पालन करावे अन्यथा कारवाई अटळ आहे असा इशारा ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी वाहन चालकांना दिला आहे.
तसेच ओतूर परिसरातील दुचाकी, कारचालक,मालवाहतुक वाहने पिकअप,ट्रॅकचालक यांनी देखील कॉलेज,शाळा व गर्दीच्या ठिकाणी वाहने हळू चालवावीत.दुचाकी,फोर व्हीलर बेशिस्त पार्किंग करू नये.अशा वाहन चालकांवर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे.नागरिकांनी मॉर्निंग वॉकला हायवे वर जाऊ नये,स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन ओतूर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.