——शब्दांकन *काशिनाथ आल्हाट
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार्थी , तमाशा पंढरी नारायणगाव . 8830857875=============
शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार
भारतात दिवाळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. धनत्रयोदशीला दिवाळीच्या सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. दिवाळी हा सण दिव्यांचा, दिवाळी सण आनंदाचा, दिवाळी सण हा उत्सवाचा. गरिबापासून ते श्रीमंता पर्यंत तो उत्साहाने साजरा करतात. दिवाळी सणाच्या निमित्ताने सोने, भांडी, कपडे ,जागा, घर, शेती, या संपत्ती बरोबर लक्ष्मीपूजनासाठी “झाडू “खास खरेदी करतात .”संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून धनतेरस हा दिवस ओळखला जातो. धनत्रयोदिशेला हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे. मत्स्य पुराणात “झाडूला” लक्ष्मी म्हणून संबोधले आहे.म्हणून दिवाळीच्या दिवसात ‘झाडू’ खरेदी करण्याची परंपरा आहे . झाडू ‘घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक गोष्टी काढून टाकते”. झाडू मुळे घराला सुख शांती लाभते. संपत्ती वाढते. म्हणून दिवाळीच्या निमित्ताने झाडू खरेदी केल्यास ‘घरातील लक्ष्मी बाहेर जात नाही’ त्यामुळे दिवाळी सणाच्या निमित्ताने झाडू खरेदी करतात. ‘खरे तर!’ पूर्वी बोलण्याची एक प्रथा होती.” दीड दमडीची केरसुणी घ्यावी, आणि तिचा पायगुण पहावा” ‘दमडी’ हा पूर्वी चलनाचा प्रकार होता. तो चलन प्रकार आता अस्तित्वात जरी नसला, तरी झाडू आजही अस्तित्वात आहे ‘.दीड दमडीची’ म्हणजे ‘कमी किमतीची’ पण तिच्यामुळे घरात सौख्य ,समृद्धी, संपत्ती नांदते. यासाठी झाडूचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ‘ झाडू ‘ ही घर ,अंगण, परिसर, रस्ता, इमारत आतून बाहेरून स्वच्छ आणि साफ करते. ‘झाडू ‘ही जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आदर्श शिकवते. “स्वार्थाची अपेक्षा न करता जनसेवा करा” प्रत्येक व्यक्तीने आचाराने, विचाराने स्वच्छ असले पाहिजे.” ही शिकवण खरं तर झाडू देते. झाडूला आधुनिक युगात विविध नावाने ओळखले जाते. ‘केरसुणी’, ‘झाडू,’ ‘झाडणी’ ‘शिरणी’ इंग्रजीत Broom, यांत्रिक क्लिनर अशी अनेक नावे आहेत. झाडूचे प्रकार दोन एक लहान (आखूड) मोठे म्हणजे (लांब) या झाडूची लांबी 25 ते 35 सेंटीमीटर पासून 70 ते 100 मीटर असू शकते . लहान झाडूची लांबी पंचवीस 20 ते 25 सेंटीमीटर असते. पूर्वी जात्यावरती दळणे दळली जात होती .त्यावेळी जात्याच्या पाळीचे पीठ साफ करणे. किंवा अडचणीतील जागा साफ करण्यासाठी या झाडूचा वापर केला जात होता . “झाडू” माडाच्या, हिरांचे, सिंधीच्या झाडाच्या पात्यांपासून तयारी केली जाते. माड व हिरांच्या झाडापासून ‘झाडू ‘म्हणजे गवताळ पाला असतो. त्याचा वापर कोकणात मोठ्या प्रमाणात केला जातो .कमी पावसाच्या भागात सिंधीच्या झाडांचे प्रमाण जास्त असते.त्याच्यापासून फडे.आणि फड्या पासून झाडू तयार केला जातो. झाडू बांधण्याची दोन पद्धती असतात .एक दोन फडाची व दुसरी तीन फडाची झाडू. झाडू टिकण्यासाठी मजबूत जी असते .ती तीन फडाची असते. झाडू तयार करण्यासाठी झाडू तयार करणा-या कारागिरांचे खूप कष्ट असतात. ‘झाडू’ तयार करण्यासाठी कच्चा माल सिंधीच्या झाडांचे फडे आणणे, वाळवणे, त्यावर पाणी मारून काही दिवस मुरवणे, तिच्या चिरा काढणे, फडे सडकणे, खांडे करणे म्हणजे जुळे करणे अशा प्रकारे झाडू तयार करण्यासाठी 20 ते 25 मिनिट एक झाडू तयार करण्यासाठी वेळ लागतो .
कसरतीचे काम असते . ते म्हणजे ‘झाडूची मूठ करणे’ .मूठ बांधणे ही एक कला असते .ती फड्याच्या पडीने म्हणजे (दोराने) फडयापासून’ पड” तयार केली जाते. त्या पडीने मूठ बांधतात. अलीकडे पडी ऐवजी नायलॉनच्या दोराचा वापर केला जातो. पूर्वीपासून ‘झाडू’ बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय मातंग समाजाचा होता. झाडू बनवण्यात मातंग करागिर अतिशय वाकबगार होते. झाडूची मूठ बांधताना त्यांची मनस्वी इच्छा असावी की, “झाडूची मूठ घट्ट पाहिजे.” ‘माझा झाडू ज्या घरात जाईल, त्या घराचे घरपण एकीचे, समृद्धीचे आणि संपत्तीने भरून जावू दे.! ‘त्या घराचे दारिद्र्य दूर होऊ देत !’त्या घरात समृद्धी लाभू देत!” या भावनेने तो झाडाची मूठ बांधतो. खरं ‘तर’! दिवाळीच्या सणात ‘केरसुणीला’ लक्ष्मी समजून पूजा केली जाते. पण बाकी इतर वर्षभरासाठी फक्त ती केरसुणी असते. ‘केरसुणी’ हा शब्दप्रयोग ही द्वीअर्थी वापरला जातो. एखाद्या महिले बद्दलचा राग ,द्वेष, सूड व्यक्त करण्याचा असेल किंवा तिला कमी लेखायचे असेल .तर तिला ‘केरसुणी’ म्हणून संबोधले जात होते .केरसुणीचा दुसरा अर्थ ‘लक्ष्मी’ समृद्धी स्वच्छतेचे प्रतीक’, स्वच्छतेचे साधन, साफ करण्याचे साधन. ज्याप्रमाणे दिवाळी सणात केरसुणी खरेदी आणि तिची पूजा करण्याचे महत्त्व आहे. त्याप्रमाणे हिंदू धर्मात लग्न विधीत ‘झाडू’ चे महत्व आहे. लग्न सोहळ्यात कन्यादान विधी करताना. संसार उपयोगी भांडी ,व इतर साहित्य नववधूला दिली जातात .संसार म्हणून दिला जातो. त्याच बरोबर नवी कोरी ‘झाडू’ ही दिला जातो.’ मुलीचा संसार सुखाने, समृद्धीने, भरभराट होऊ देत!’ अशा नकळत भावना त्या संसारात ‘झाडू’ देण्याच्या असाव्यात. मुलीचा संसार हा ‘जाई जुईच्या वेली प्रमाणे फुलत राहू दे.आणि संसारातील विचार झाडूच्या मुठीप्रमाणे एकत्र राहू देत. अशा भावना या झाडू देण्याच्या पाठीमागच्या असतील. ‘नववधू’ म्हणजे नवरी ‘मुलगी ‘आणि नवी कोरी ‘झाडू’ म्हणजे ‘लक्ष्मी’ यांच्या जगण्यातील बरेचसे साम्य आपल्याला दिसून येते. प्रत्येक मुलीचा ‘बाप’ आपल्या मुलीला लहानाचे मोठे करतो.तिच्यावर संस्कार करतो. ज्यावेळी ही मुलगी वयात येते. त्यावेळी तिचे लग्न करून देतो. ज्या घरात तिचे नांदणे सुरू होते .त्या घरात तिचा शेवट होतो. जीवनातील अनेक सुखदुःखाचे चढउतार, ऊन वारा, ती वादळ वारे झेलत ,पचवत ती आनंदी जीवन जगते. त्याप्रमाणे ‘झाडूचे’ जीवन सुद्धा तसेच असते. फक्त ‘झाडू’ ला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत.” अकल्प आयुष्य व्हावे, माझी तया कुळा | ” या वचनाप्रमाणे झाडू बनवताना ‘झाडू कारागीर’ हा सुद्धा झाडूवरती अनेक संस्कार करतो. त्या शिवाय झाडू तयार होत नाही. दिवाळीच्या सणात केरसुणीची पूजा केली जाते. पण इतर वेळेस तिला पायाने कधी कधी लाथडले जाते .अशी अनेक वादळवारे सहन करते. राग ,वैताग व्यक्त करण्यासाठी अनेक महिला झाडू मोठ मोठ्याने आपटतात , फेकतात, फेकून देतात. जाग्यावर पडू देतात. तरी ही ‘झाडू ‘त्याच घरात राहते. ‘ घराला घरपण तिच्यामुळे असते’ घरात ती नसेल, तर घराचा उकिरडा होण्यास वेळ लागत नाही. संत गाडगेबाबांनी ‘झाडूला ‘ प्रतिष्ठा म्हणून दिली. ‘स्वच्छता हाच माझा परमेश्वर आहे’. ‘लेक हो ,हातात झाडू घ्या. आणि सगळे परिसर स्वच्छ करा’! “घाण हे रोगाचे बीज आहे”. ‘जिथे स्वच्छता नाही, तिथे उकिरडा” अशा या झाडूचे महत्व जेवढे दिवाळी सणाच्या निमित्ताने आहे. तेवढेच प्रत्येकाच्या जगण्यात झाडूला महत्त्व आहे. अलीकडील काळात ‘झाडू’ हा व्यवसाय न राहता. त्याला व्यापाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वी मातंग समाज हा झाडू व्यवसाय करत होता. आता सर्व जाती-धर्मातील व्यक्ती झाडूचा व्यापार आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहे. पूर्वी हा व्यवसाय उदरनिर्वाचे साधन होते. ते आता आर्थिक व्यापाराचे साधन बनले आहे .
‘झाडू ही निस्वार्थपणे जगते’ “ती आयुष्याच्या शेवटपर्यंत जनसेवा करत राहते. प्रत्येक माणसाच्या चरणांची धूळ स्वतः च्या कपाळाला लागावी. आणि जेवनावळीच्या उष्टावळी काढून सारा परिसर स्वच्छ व्हावा हाच जीवन प्रवास ठरावा “. ही भावना झाडूची असते.