शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार
सर्वच राजकिय पक्षांकडून मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येवर आधारीत स्थानिक महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिम उमेदवार न देता संपूर्ण मुस्लिम समाजाचा विश्वासघात कऱण्यात आला आहे. मुस्लिम समाजातील सर्व स्तरातील बुद्धजीवि वर्गाने – धर्मगुरू – राजकिय पक्षांचे पदाधिकारी – सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व मुस्लिम समाजातील कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था तसेच समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्र यांनी सर्वच राजकिय पक्षांकडे मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या लोक संख्येनुसार विविध मतदार संघात प्रतिनिधित्व व उमेदवारी मागूनही राजकिय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या चर्चेत व बैठकीत मुस्लिम समाजाला आश्वासन व विश्वास देऊनही ठरल्या प्रमाणे उमेदवारी न देता संपूर्ण मुस्लिम समाजाचा विश्वासघात करून समाजाची फसवणूक करून गद्दारी केली असल्याचा आरोप समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
लोकसभा – विधान परिषदेत व आता विधान सभेच्या निवडणूकीत ही सदर राजकिय पक्षांकडून मुस्लिम समाजाचा सोईनुसार वापर करून घेऊन मुस्लिम समाजास जाणिव पूर्वक सत्तेपासून दूर ठेवले जात आहे. महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिमांचे हक्क मारून परप्रांतिय मुस्लिम नेतृत्व तयार करून महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिम समाजावर थोपविण्याचे पाप करून अन्याय करीत आहेत. महाराष्ट्रात परप्रांतिय मुस्लिम नेतृत्व तयार करून हे राजकिय पक्ष स्थानिक महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिमांची मते घेऊन सत्तेत येतात. महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिम मतदारांनी दिलेल्या मतांची जाणिव न ठेवता हे पक्ष व नेते सतत स्थानिक मराठी मुस्लिम समाजाच्या मुलभूत हक्क व अधिकारांचे हनन करून समाजावर अन्याय करतात व महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिम समाजास सत्तेपासून दूर ठेवून त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहापासून दूर ठेवतात. महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिम समाजातील बुद्धजीवी तसेच सुशिक्षित लोकांनी या सर्व बाबींचा विचार करून अशा प्रकारे गलिच्छ राजकारण करणाऱ्या पक्षांना व नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन हाजी इर्शादभाई यांनी केले आहे. महाराष्ट्रातील समस्त मराठी मुस्लिम समाजाची फसवणूक व विश्वासघात करून गद्दारी करणाऱ्या पक्षांना येत्या काळात त्यांची जागा दाखवून देवून सर्वपक्षीय मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी सदर कृतीचा जाहीर निषेध करून सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष वेधून घेऊन मुस्लिम समाजाच्या राजकिय अस्तित्व – अस्मितेसाठी व स्वाभिमानासाठी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून संविधान तसेच राज्यघटनेने दिलेल्या हक्क व अधिकारांचे रक्षण करावे असे भावनिक आवाहनही हाजी इर्शादभाई यांनी केले आहे.