शुभम वाकचौरे
दिनांक २५/०६/२०२४ रोजी रणदिवे कुटुंबियांनी उपोषण स्थगित केल्यानंतर गटविकास अधिकारी महेश डोके, यांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट घेऊन रणदिवे कुटुंबीयांना न्याय मिळणेबाबत कार्यवाही करणेकामी घरकुलाच्या विषयास १० दिवसाच्या आत चौकशीचे काम पुर्ण करण्यात येईल. व दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असे रणदिवे कुटुंबीयांना कळविण्यात आले होते. तरी कारवाई बाबत गटविकास अधिकारी महेश डोके यांनी कुठले ठोस पाऊल का उचलले नाही? गटविकास अधिकारी कोणाची तरी पाठराखण तर करत नाही?अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
शिरूर तालुक्यातील जांबुत मध्ये घरकुल घोटाळा प्रकरणातील पीडित मागासवर्गीय कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी व भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोषी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून पिडीत कुटुंबीयांना न्याय द्यावा या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टी वर्षभरापासून निरंतर पाठपुरावा करत आहे. पंचायत समिती शिरूरचे गटविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशी च्या अहवालात अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही अतिशय संतापजनक आणि निंदनीय बाब आहे. या अन्यायाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर शहर सचिव मा. सागर घोलप यांनी 7 ऑक्टोबर 2024 पासून शिरूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे की, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश द्यावेत आणि शासकीय कामात अनियमितता व भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र व आक्रमक होईल.
बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्या चे मा. अमोल भाऊ लोंढे, तसेच महिला आघाडीचे प्रधान महासचिव सुनिता ताई कसबे,राज्य संयोजक मा.नाथाभाऊ पाचर्णे ,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा.फिरोजभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाला भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, भारतीय बहुजन पालक संघ,मुलनिवासी महिला संघ आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते समर्थन देत असून, जांबुत येथील पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी या लढ्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत.
मा. सागर घोलपशहर सचिव, बहुजन मुक्ती पार्टी, शिरूर—न्याय हक्कासाठी लढा आमचा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आमचा!—