शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार.
शब्दांकन= काशिनाथ आल्हाट
. भाग 12 वा
शुद्ध बीजापोटी |
फळे रसाळ गोमटी ||
मुखी अमृताची वाणी |
देह देवाचे कारणी ||
सर्वांग निर्मळ |
चित जैसे गंगाजळ ||
तुका म्हणे जाती |
ताप दर्शनें विश्रांती ||
या संत वचनाप्रमाणे निवृत्ती महाराजांचा परिवार हा महाराष्ट्रातील समाज बांधवांना परिचित आहे .तसा तो बहुजन समाजालाही परिचित आहे .निवृत्ती महाराज यांना तीन मुले आणि तीन मुली यापैकी पांडुरंग गायकवाड हा त्यांचा मोठा मुलगा.
निवृत्ती महाराज यांनी पांडुरंग हे नाव ठेवण्या पाठीमागची भूमिका की ,सतत पांडुरंगाचे नामस्मरण मुखाने घेता येईल .आणि वडिलोपार्जित पारंपरिक संप्रदायाचा वसा मोठा मुलगा चालवेल. अशा महत्त्वकांक्षा मनात ठेवून. हे नाव ठेवले . 'पांडुरंग'.असावे असे वाटते.
निवृत्ती महाराजांचा परिवार कुटुंब तसा गरीबीचा .परंतु गरिबीतही त्यांनी स्वतःचे दुःख दुसऱ्याला जाणवू दिले नाही. कष्टमय जीवन जगत परिस्थितीवरती मात करून प्रत्येक दिवस हा सोन्याचा मानला.
*"वादळ वा-याचे दिवस येतात.' ते कायम रहात नाहीत "*
याची जाणीव त्यांना होती. ‘पांडुरंग’ हे परमेश्वराचे चिंतनशील नामस्मरण जरी असले. तरी पांडुरंग गायकवाड यांना शाळेत शिकण्यापासूनच्या समस्यांना सामोरे जावे लागले. गरीबीच्या वेदना ह्या काय असतात? त्या त्यांनी अनुभवल्या होत्या.
वडील हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने घराबाहेर असल्यानंतर घरात सर्व जबाबदारी आई सुभद्रामाता ही सांभाळ होती. तिची होणारी परवड ही 'पांडुरंग' यांनी पाहिली होती.
” मनाची जिद्द असल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत” त्याप्रमाणे पांडुरंग गायकवाड यांच्यासमोर नात्यातील अनेक माणसांच्या शिक्षणाचा आदर्श होता .त्यांच्याप्रमाणे मी सुद्धा मोठा होईल. अशी मनाशी खुणगाठ बांधून जिद्दीने रात्र रात्र जागून त्यांनी अभ्यास केला. वसतीगृहात राहिले. बोर्डिंगचे जेवण जेवले.
इयत्ता नववीमध्ये शिक्षण प्रवाहात आलेला अडथळा , गुरुजींचे मार्मिक बोल , मनाला वेदना देणारे शब्द, आणि वर्गात झालेला अपमान .हा हृदयापर्यंत पोहोचला. त्या दिवसापासून मनाशी जिद्द धरली .अभ्यास केला. त्यानंतर वर्गात त्यांचा पहिला क्रमांक आला. एसएससी बोर्ड ,बारावी बोर्ड अगदी एम .ए आणि पी एचडी होईपर्यंत शिक्षणा प्रवाहात अग्रेसर राहिले.
शाळेत तसेच कॉलेजमध्ये , प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी म्हणून गणले गेले.त्यांच्या हुशारीने आणि त्यांच्या कर्तुत्वामुळे त्यांना विविध प्रकारच्या शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त होत गेल्या .तसाच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये गुणात्मक नावलौकिक प्राप्त झाला .
ज्या कॉलेजमध्ये अकरावी ते एम. ए पर्यंत शिक्षण घेतले. त्याच मंचरच्या अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य अशा पदापर्यंत ते पोहोचले . ही बाब ज्याप्रमाणे गायकवाड परिवाराला अभिमानास्पद होती. त्याचप्रमाणे बहुजन समाजाला ही आदर्श होती.
रयत शिक्षण संस्थेने मला भरपूर दिले. अशी भावना त्यांच्या मनामध्ये सातत्याने आहे . रयतने त्यांचे कुटुंब घडवले .कारण त्याच कॉलेजमध्ये त्यांचे तीन बहिणी आणि दोन भाऊ यांनी उच्च शिक्षण घेतले.
गायकवाड परिवारात पांडुरंग गायकवाड यांना तीन पिढ्यांचा पारंपरिक संप्रदायाचा वारसा लाभला होता .त्यांचे वडील निवृत्ती महाराज यांनी 66 वर्षे पायी वारी केली. वडीलांची कीर्तन, प्रवचन ही परंपरा त्यांच्या घरामध्ये होती. 'त्यामुळे पांडुरंग गायकवाड यांच्यावरती संस्कार कुटुंबाने जेवढे केले.तेवढे रयत संस्थेने केले'. ही भावना त्यांची असते .
प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी शिक्षण क्षेत्रात अनेकांना आणले.शिक्षण सोडून भटकंती करत असणाऱ्या मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखविला .अनेक नातेवाईकांच्या मुलांनाही त्यांनी शाळेत घातले. वसतीगृहात पाठवले. ज्याप्रमाणे त्यांच्यावरती संस्कार झाले होते. तसेच संस्कार त्यांनी अनेक मुलांवरती केले. आज ती मुले विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
पांडुरंग गायकवाड हे ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून जातात .त्यावेळी त्यांच्या स्वतःची परिस्थिती ते कधी दडवत नाहीत. व त्या काळात घडलेल्या छोट्या-मोठ्या सर्व आठवणींना ते वाट करून देतात .त्यापैकी ते नेहमी सांगतात.
15 ऑगस्ट दिवस होता. सगळे मुले टापटीप कपडे घालून , बूट घालून १५ ऑगस्टच्या दिवशी झेंडावंदन करण्यासाठी शाळेत गेली होती. परंतु पांडुरंग गायकवाड यांना शाळेत जाता आले नाही. इतर मुलांना स्वच्छ सुंदर असे गणवेश होते.पण यांच्याकडे गणवेश नसल्याकारणाने त्यांना झेंडावंदनाला शाळेत जाता आले नाही. ती खंत मनात राहिली. पुन्हा मनात एकदा विचार आला . की , “आयुष्यातील आज जरी ध्वजावंदन दिवस संपला असेल.”! परंतु एक ना एक दिवस पुन्हा नावलौकिकात राहून. ध्वजावंदन माझ्या हस्ते करण्याची वेळ येईल.
प्राचार्य गायकवाड यांच्या त्या अपेक्षा खऱ्या ठरल्या. जेव्हा पांडुरंग गायकवाड प्राचार्य झाले. त्यावेळी त्यांच्या शुभ हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजाच्या दोरीला हात लावला .तेव्हा डोंगरावरील त्यांना तो प्रसंग आठवला .अशा कष्टाचा मोलमजुरीचा त्यांचा जीवनपट सांगता येईल .
नोकरीच्या निमित्ताने ते महाविद्यालयात एनसीसी ऑफिसर होते .त्यामुळे जीवनाला वेगळी शिस्त लागली. 1983 मध्ये पी. एस .आय म्हणून निवड झाली होती. परंतु वडिलांच्या मनात पोलीस होण्याऐवजी शिक्षक व्हावे . त्याप्रमाणे ते त्यांच्या इच्छेखातर शिक्षक झाले.
जुनियर कॉलेज, त्यानंतर सीनियर कॉलेज, आणि त्यानंतर डॉक्टर, नंतर प्राचार्य अशा शिक्षण क्षेत्रातल्या एक ना अनेक पदव्या स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांनी प्राप्त केल्या.
त्याच्या स्वकर्तृत्वावर अनेक महाविद्यांमध्ये प्राचार्य पदाची नोकरी केली. त्यांनी त्या कॉलेजला एक ग्रेड मिळवून दिली . 'जीवनातल्या अनेक काट्याच्या वाटा दूर केल्याने, आता आनंदाच्या बागेत बसून अनेक फळांचा रसास्वाद ते घेत आहेत. *"टाक्याचे घाव सोसल्याशिवाय, देव पण येत नाही*" हे त्यांच्या जिवन प्रवासातून दिसते आहे . हा सुखकर प्रवास करताना अनेक ज्ञात अज्ञात घटकांचे सहकार्य आणि मदत लाभत गेली.
प्राचार्य गायकवाड यांना
पुणे विद्यापीठातील सिनेटवर काम करण्याची संधी मिळाली .विद्यार्थी कल्याण मंडळावरती अनेक वर्षे सल्लागार म्हणून काम केले. सुवर्णपदक निवड समिती कमिटी करण्याची संधी मिळाली .पी.एचडीसाठी मार्गदर्शक या सर्वांची फलप्राप्ती म्हणून डॉ. गायकवाड यांना संग्राम प्रतिष्ठानचा पुरस्कार , कोल्हापूरचा समाजभूषण पुरस्कार ,जुन्नर ,आंबेगाव चा भूषण तालुका भूषण पुरस्कार, संस्थेचा गुणवंत सेवक पुरस्कार अशा विविध संस्थांनी संघटनांनी त्यांची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांचाआत्मविश्वास
वाढवण्यासाठी त्यांना प्राचार्य गायकवाड हे विविध योजना केल्या. महाविद्यालय हे ग्रामीण भागात जरी असले, तरी त्या त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी त्यांनी ठेवल्या नाहीत .त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व शिक्षक अतिशय समर्पित वृत्तीने काम करत होते .दरम्यानच्या काळात त्यांनी महाविद्यालयाचा परिसर हिरवागार करून टाकला. सुबाभळ, सिताफळ, आवळा, आंबा. चिकू ,पपई, शेवगा ,बोर पेरू यासारख्या झाडांची नारळ यासारख्या अनेक झाडांची लागवड केली. आत्ता त्या झाडांना फळे येऊन विद्यार्थी शिक्षक आणि सेवक त्याचा आनंद घेत आहेत. ज्याप्रमाणे शाळेच्या परिसरामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या झाडे आणि वेली फुलवल्या त्याप्रमाणे त्यांनी माणसे जोडण्याचे काम सातत्याने केले.
नोकरीच्या निमित्ताने डॉ.पांडुरंग गायकवाड यांनी अनेक पदे भूषवली. पुणे विद्यापीठ सिनेटवर, अनेक कमिट्यांवर काम केले .सध्या ते भारतीय शिक्षण संस्था प्रमुख विश्वस्त व बेंगलोर नॅक राष्ट्रीय पातळीवरती कार्यरत आहेत. परदेशात इटली फ्लोरेन्स येथे संत साहित्यातील संतांचे वैश्विक कार्य या विषयावर पेपर प्रेझेंट केले.विविध पुरस्कार विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, तालुका भूषण पुरस्कार, महाविद्यालयांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार अशा पुरस्कारांना त्यांना सन्मानित केले. सन 2022 मध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार वळसे पाटील यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ संपन्न झाला.
प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांचा घोडेगाव येथील पायी प्रवाहापासून सुरू झालेला प्रवास प्राचार्य पदापर्यंत पोहोचला . या प्रवासाचा विचार केल्यास . पांडुरंग गायकवाड यांचे जीवन अतिशय खडतर मार्गाचे होते. कठिण प्रवास ठरला गेला ."एक व्रतस्त "म्हणून त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने आपली नजर गेल्याशिवाय राहत नाही.
'बीज शुद्ध असले ,तर येणारी फळे सुद्धा उत्तम उपजतात.ज्याच्या मुखात परमेश्वराचे हरिनाम असते. त्याची वाणी उत्तम असते. त्याचा देह सत्कारणी जातो. अशा माणसाचे जीवन गंगाजळा प्रमाणे पवित्र होते.
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी,
फळे रसाळ गोमटी|
मुखी अमृताचे वाणी ,
देह देवाचे कारणी!
या वचनाचा मागोवा घेतल्यास डॉ.पांडुरंग गायकवाड यांच्या जीवनाशी तंतोतंत समरस आहे .असे वाटते.
प्राचार्य डॉ.
पांडुरंग गायकवाड यांच्या जीवन पटाचा उल्लेख करताना एक आठवण सातत्याने होते. त्यांना कै. सुदाम राजगुरू यांच्यासारखा माणूस शिक्षणाच्या प्रवाहामध्ये भेटला.त्यांचा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये खारीचा वाटा राहिला . प्राचार्य गायकवाड यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तोच अनुभव प्राचार्य डॉ. गायकवाड यांच्या कर्तृत्वातून त्या घटनेची पुनरावृत्ती परतफेड गायकवाड यांच्या हातून झालेली दिसते .
कै.सुदाम राजगुरू यांचा मुलगा चंद्रकांत राजगुरू सध्या ते कोर्टामध्ये बेलीब
पदावरती आहेत. त्यांचा मुलगा मंचर या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता . अकरावीत चंद्रकांत राजगुरू यांच्या मुलाला मार्क कमी पडले .म्हणून त्यांनी बारावी सायन्स न करता. बारावी आर्ट करण्याचा निर्णय घेतला. यासाठी वर्ग बदलण्यासाठी ते प्राचार्य गायकवाड यांच्याकडे गेले. सांगितले त्याला गुण कमी पडलेले आहेत .त्याला
बी ए या शाखेत प्रवेश द्या. त्यावेळी प्राचार्य गायकवाड यांनी नात्यातील चंद्रकांत राजगुरू यांना योग्य मार्गदर्शन केले .अकरावी सायन्सला जेवढे मार्ग पडलेत .त्याच्यापेक्षा तो बारावी सायन्सला चांगले मार्क मिळविल. त्याला सायन्स फॅकल्टी बदलण्याची गरज नाही. त्यांनी प्राचार्यांचे ऐकले. चंद्रकांत राजगुरूंचा मुलगा पुढे इंजिनीयर झाला. आणि आत्ता अतिशय चांगल्या पदावरती कंपनीमध्ये कार्यरत आहे. याचे श्रेय आज प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांना जाते.
" खरं तर !' या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते .की, कै.सुदाम राजगुरू यांनी प्राचार्य गायकवाड यांना शिक्षणाच्या कार्यात मदत केली होती. तेच ऋण व्यक्त करण्याची संधी त्यांच्या नातवाच्या रूपाने प्राचार्य गायकवाड यांना मिळाली.
असे म्हटले जाते. “शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते’. “सर्जनशीलतेने माणसात प्रगल्भ विचार येतात.’ “विचाराने ज्ञान वाढते’. आणि ज्ञानाने माणूस महान बनतो”. याप्रमाणे प्राचार्य डॉ.पांडुरंग गायकवाड यांची जीवनशैली बनली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, *"शिक्षण ही पवित्र संस्था आहे .'शाळेत मने सुसंस्कृत होतात'. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे"*.
या पवित्र क्षेत्राची जाणीव ह. भ .प .निवृत्ती महाराज गायकवाड यांना झाली असावी. म्हणून त्यांनी पांडुरंग गायकवाड यांना शिक्षक क्षेत्रात नोकरी कर असे सांगितले असावे . ती संधी प्राचार्य डॉ. गायकवाड यांना मिळाली.त्यामुळे त्यांचा सर्व परिवार एखाद्या बागेसारखा सुगंधीत झाला. पत्नी प्रा .शीला गायकवाड सेवानिवृत्त आहेत.मुलगा डॉ. प्रतिक गायकवाड ,सून डॉ.स्नेहल गायकवाड,मुलगी डॉ.प्रतिमा वैरागर , जावई डॉ.पवन वैरागर, नातवंडे, सर्व आनंदी परीवार आहे. त्याच प्रमाणे भाऊ आणि बहिणींचा संसार सुद्धा सुखाचा आणि समाधानी आहे.