*मनातील दोन शब्द*भाग 5 वा*
काशिनाथ आल्हाट* *साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार्थी*8830857875
शिरूर प्रतिनिधी – शकील मनियार
निवृत्ती गायकवाड महाराजांच्या ‘जीवनशैलीचा विचार जर केला .तर त्यांचे जीवन एखाद्या फुलाप्रमाणे ते जीवन जगले’ .त्यांच्यामते फुलाला जो पर्यंत सुगंध आहे .तोपर्यंत फुलाची किंमत असते. पण फुलाचा सुगंध निघून गेल्यानंतर त्या फुलाच्या देठाला आणि पानाला काहीही किंमत रहात नाही .या गोष्टीचा मागोवा घेऊन ते जगले. संत श्रेष्ठ पैठण निवासी एकनाथ महाराजांचे एक सुंदर संत प्रमाण ते असे ” परिमळ गेलीया ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह तैसा |
या गोष्टीचा बोध गायकवाड बाबांनी घेतलेला होता. असे वाटते ..परमेश्वरांने आपणास दिलेला हा देह जोपर्यंत आहे .तोपर्यंत त्या जीवनाचा आनंद घेऊ या.! सोनं करू या !हा देह सन्मार्गासाठी आणि समाजाच्या सुधारण्यासाठी लावू या ! एकंदरीत जीवनशैलीतून त्यांचा हा अनुभव येतो . हा पंचतत्वाचा मानवी देह निर्माण झालेला आहे .जोपर्यंत आहे. तो पर्यंत आपण चांगले कार्य केले पाहिजे .ते कुटुंबासाठी असेल अथवा समाजासाठी असेल. “खरं तर !संतांना जात धर्म हे काही नसतो.” त्यांची जात आणि त्यांचा धर्म म्हणजे “संत मेळा’ परमेश्वर हाच त्यांचा धर्म. संत जन्माला येतात .संत जन्माला आले की, जन माणसाचा उद्धार होतो. आणि वसंत आला की, निसर्गाचा उद्धार होतो .माणसाच्या आणि निसर्गाच्या उद्धारासाठी संत आणि वसंत हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. गायकवाड महाराज हेसंत म्हणून बहुजन समाजाला लाभलेले एक वरदान होते.
निवृत्ती महाराजांचा एकच धर्म होता. तो म्हणजे ईश्वर, परमेश्वर .भक्ती कारण परमेश्वराची भक्ती ते करीत असल्याने परमेश्वर त्यांच्या कुटुंबासाठी काम करत राहिले. असेच म्हणावे लागेल. त्यांच्या कुटुंबामध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित होत राहिली. त्यांच्या मुलांना शिक्षणाचे संरक्षण, बळ परमेश्वराने दिले असावे. त्यांच्या कुटुंबाला शांतीचा मार्ग दाखवण्याचे काम परमेश्वराने केले. खरे तर! “भक्ती आणि मुक्तीचा संगम म्हणजे संत असतात”. ते संत या कुटुंबामध्ये निवृत्ती महाराज यांच्या रूपाने जन्माला आले होते.
आपण अध्यात्माचे पुण्य कर्म करत राहावे. एकदा का देह संपला. तर पुन्हा एकदा आपल्याला हे पुण्य कर्म करता येणार नाही. बहुजनांना आनंद देता येणार नाही .कुटुंबाला आनंद देता येणार नाही. दैनंदिन जीवनामध्ये एक वाजंत्री,एक बासरी वादक, गायक, पखवाज वादक, तबला वादक , हार्मोनियम वादक,भजन, भारुड, प्रवचन, कीर्तन, उत्तम अभिनय, कर्तव्यनिष्ठ पती, कणखर बाप , समाजासाठी पेटती मशाल हाती घेणारा सुधारक, शिक्षण तत्ववेत्ता अशा नाना भूमिका त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये साकारलेल्या आपल्याला दिसून येतात .
ज्यावेळी ते परमेश्वराची भक्ती नामस्मरण करत होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाची परमेश्वर काळजी घेत होते. संप्रदायाच्या निमित्ताने सतत ते घराबाहेर असल्याने कुटुंबाची संपूर्ण काळजी मुलांचे शिक्षण, मुलांचे संगोपन ,पाहुणेरावळ्यांचा पाहुणचार ,मुलांचा आजार ही सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या पत्नी सुभद्राबाई यांनी पार पाडली .
‘खरे तर !ज्यावेळी निवृत्ती महाराज यांच्या नावाचा नावलौकिक होतो. त्याचे खरे श्रेय त्यांच्या सौभाग्यवती सुभद्राबाईंना जाते. आज ह .भ .प. निवृत्ती महाराज गायकवाड यांचा आदर्श बहुजन समाजाला आदर्श म्हणून सांगितला जातो.पण त्या आदर्शापर्यत नेण्यासाठी त्यांच्या पत्नी सुभद्राबाई यांची कसोटी होती. ह्या अक्षर शून्य असणाऱ्या महिलेने गायकवाड महाराजांच्या जीवनामध्ये मोलाची साथ दिली. एका अनाथ असणाऱ्या, गुरे राखणा-या,जेमतेम शाळा शिकणा-या ,कोणाचाही आधार नसलेल्या माणसाच्या जीवनामध्ये सोन्याच्या पावलाने खेड तालुक्यातील कोरेगावच्या सुभद्राबाई लोंढे परिवारातून गायकवाड परिवारात सौभाग्याचं लेणं घेऊन आल्या . लोंढे परिवारातील सुभद्राबाई यांना शिक्षण जरी घेत आले नाही. तरी त्यांनी त्यांच्या भावांना, बहिणींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. समाजामध्ये नवलौकिकत असणारे बाळासाहेब लोंढे,नानासाहेब लोंढे आणि सेवानिवृत्त वनाधिकारी वसंतराव लोंढे यांच्या सुभद्राबाई या भगिणी होत्या. सुभद्राबाई म्हणजे तीन अक्षरांचे संयोजन होय. महाभारताच्या दृष्टीने विचार जर केला .तर वासुदेवाची ही आवडती कन्या होती. बलरामाची बहीण आणि कृष्णाची सावत्र बहिण अशी ही महिमा नावाची होती. सुभद्रा म्हणजे वैभवशाली स्री, महान कल्याण स्रोत असणारी स्त्री. सुभद्रा या नावाप्रमाणेच गायकवाड महाराज यांच्या संसारात जाई जुईच्या वेलीप्रमाणे संसार सुगंधित केला.
(क्रमशः भाग 6 पुढील अंकात)