जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
सरकार शेती विषयी चुकीची धोरणं राबवीत आहे.याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला गेला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढवण्याचे पाप सरकारचे आहे.कर्जबाजारी होऊन महिन्याला सरासरी २४० आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत. वाढत्या संकटांमुळे यात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.तरी शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्ज माफी करुन सात बारा कोरा करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीसाठी राजू शेट्टी राज्यभर शेतकरी संपर्क अभियान राबवीत आहेत.
जुन्नर तालुक्यात पिंपळवंडी येथे तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने शेट्टीचा सत्कार करण्यात आला.यावेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे,कांदा उत्पादक संघटनेचे पुणे जिल्ह्याध्याक्ष प्रमोद पानसरे,शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुकाध्यक्ष संजय भुजबळ,स्वाभिमानीचे रोहिदास कुटे,सचिन थोरवे,भुषण औटी,मनोज शिंदे, कृषीभूषण पोपट हाडवळे व तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यातील शेतकरी उमेदवार प्रतीनिधीस राजू शेट्टी यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.