जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने श्रीक्षेत्र ओतूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर सायकल वारी चे नुकतेच आयोजन केले होते. पर्यावरणाचा व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देत या ग्रुपने सलग तिसऱ्या वर्षी ही सायकल वारी पूर्ण केली. अशी माहिती ओतूर सायकल ग्रुपचे अध्यक्ष जयसिंग डुंबरे यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना ग्रुपचे सचिव गणेश डुंबरे म्हणाले की,”ओतूर सायकल ग्रुप हा पुणे जिल्ह्यातील एक क्रियाशील ग्रुप असून या ग्रुपच्या सदस्यांनी आतापर्यंत अनेक सायकल राईडचे आयोजन केले आहे. यावर्षी सलग तिसऱ्या वर्षी श्रीक्षेत्र पंढरपूरला ओतूर सायकल ग्रुप पोहोचला.या ग्रुपचे ३७ सदस्य ओतूर वरून पहाटे तीन वाजता प्रवासाला निघाले व २८५ किलोमीटरचे अंतर दीड दिवसांमध्ये पूर्ण करून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी सायकलवरून पंढरपूरला पोहोचले.या वारीमध्ये वय वर्ष १५ ते ६७ वयोगटातील स्त्री पुरुष सहभागी झाले होते.तंदुरुस्तीचा व पर्यावरणाचा संदेश देत ही वारी पूर्ण झाली.” सायकल वारी भिगवण मध्ये येताच सचिन जयसिंग तांबे व त्यांच्या परिवाराने वारीचे स्वागत आणि सत्कार करून चहापाण व्यवस्था केली.इंदापूर (सरडेवाडी)येथे पहिला मुक्काम झाला. “सायकल चालवा प्रदूषण टाळा” “सायकल चालवा पर्यावरण वाचवा” हा नारा देत देत रविवारी ही सायकल वारी सकाळी ७:०० वा. इंदापूर वरून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली व सकाळी११:३० वा. पंढरपूर मध्ये सायकल वारी पोहोचली.सर्वांनी अगदी आनंदाने विठू माऊलीचे दर्शन घेतले.पंढरपूर नगरी मध्ये सायकल वारीचे प्रचंड कौतुक झाले. आमदार दत्तात्रय सावंत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपूर मध्ये सायकल वारीचे जंगी स्वागत केले व सर्व ३५ सायकलिस्ट यांची स्नेहभोजनाची व विश्रांतीची व्यवस्था केली.यावेळी सावंत यांनी सायकल ग्रुपचे कौतुक केले व ते म्हणाले की,”ओतूर सायकल ग्रुपचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि इतरांना प्रेरणादायी आहे.शारीरिक आरोग्या साठी सायकल चालवणे निश्चितच गरजेचे आहे. त्यातून पर्यावरणाचे रक्षण तर होतेच परंतु आपली शारीरिक तंदुरुस्ती सुद्धा चांगली राहते.ओतूर ते पंढरपूर ह्या सायकलवारीसाठी रंगनाथ घोडेकर, शिवाजी गडगे यांनी अत्यंत अल्पदरात ओतूर सायकल ग्रुपला टेम्पो गाडी सायकल आणण्यासाठी दिली.तसेच आबा पाटील,मुजमुले सर,सोमनाथ नागटिळक ,विलास आदमिले यांनीही ओतूर सायकल ग्रुपला सहकार्य केले.ओतूर सायकल ग्रुपचे या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.